रेमो डिसोजाच्या हस्ते विशेष संगीत प्रकाशित
यंदाच्या व्हॅलेन्टाईनला सुप्रसिद्ध नृत्य आणि सिने दिग्दर्शक रेमो डिसोजाने एका विशेष संगीतमय नजराण्याचे अनावरण केले आहे. हा नजराणा म्हणजे आगामी येणाऱ्या ‘गावठी’ या चित्रपटातील एक रोमँटीक गाणे आहे.

‘दिसू लागलीस तू’ हे अश्विन भंडारे यांनी संगीत आणि स्वरबद्ध केलेले प्रेमगीत एका दिमाखदार सोहळ्यात रेमो डिसोजा यांनी व्हॅलेन्टाईन डे स्पेशल गिफ्ट म्हणून तरूणाईला समर्पित केले.
गावठी चित्रपटाचे पटकथा लेखक तसेच दिग्दर्शक आनंदकुमार (ॲन्डी) हे गेली पंधरा वर्षे रेमो डिसोजा यांचे सहायक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे या प्रेमगीताच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला रेमो आपल्या पत्नी लीझल यांच्या सोबत उपस्थित होता.
रेमोच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या आनंदकुमार यांच्या सिनेमाचे दिग्दर्शन, संगीत तसेच नृत्य दिग्दर्शन हे दिलखेचक असणार हे ओघाने आलेच. या प्रेमगीतासाठी एक स्पेशल सिग्नेचर डान्सस्टेप कोरीयोग्राफर आनंदकुमार यांनी चित्रीत केली आहे.
या गाण्याचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईच्या जे. डब्ल्यु. मॅरीएट या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. चित्रपटातील हिरो-हिरॉईन श्रीकांत आणि योगिता हे नवोदित कलाकार सोहळ्यात ‘त्या’ प्रेमगीतावर बहारदार नृत्य सादर करत असताना रेमो डिसोजा आणि दिग्दर्शक आनंदकुमार (ॲन्डी) यांनी न राहावल्याने स्टेजवर अचानक एंट्री घेतली आणि उपस्थितांनीही त्या स्पेशल डान्सस्टेपवर ताल धरला.
‘दिसू लागलीस तू’ हे व्हॅलेन्टाईन स्पेशल प्रेमगीत आणि स्पेशल डान्सस्टेप गावठी सिनेमाच्या अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्युब चॅनलवर पाहायला मिळेल. या सोहळ्यात गावठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण प्रसिद्ध उद्योजक श्री. किशोर गुलगुले व रेमो यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आर. बी. प्रोडक्शनचे निर्माते व कथा लेखक सिवाकुमार श्रीनिवासन, चित्रपटातील कलाकार नागेश भोसले, वंदना वाकनीस, संदिप गायकवाड, गौरव मोरे, सदानंद यादव, सिनेमॅटोग्राफर अजीत रेड्डी, संगीतकार अश्विन भंडारे – श्रेयस आंगणे, सिने व्यवसाय तज्ज्ञ कासम अली, पिकल एंटरटेनमेन्टचे समीर दिक्षीत-ऋषिकेश भिरंगी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.