खास उपस्थितीत होणार चित्रपटाचं पोस्टर अनावरण
बॉलीवूड ब्लॉकबस्टर ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी २’ या चित्रपटासाठी रेमो यांचेसोबत सहायक दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शनात कायम सहायकाच्या भूमिकेत राहिलेले आनंदकुमार (ॲन्डी) यांनी ‘गावठी’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सिने दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. गुरू रेमो डिसुजा यांचा कित्ता गिरवीत केवळ नृत्य दिग्दर्शन नाही तर चित्रपट दिग्दर्शनातही आनंदकुमार यांनी पदार्पण केले आहे. त्यामुळे आपल्या सहायक मित्राच्या पहिल्या प्रयत्नाला प्रोत्साहन देण्यासाठी रेमो डिसुजा ‘गावठी’ या चित्रपटाच्या संगीत व पोस्टर अनावरण सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

गावठी… ग्रामीण, अशिक्षित आणि अपरिपक्व विचारांच्या, गचाळ राहणाऱ्या व्यक्तीला गावठी म्हणून संबोधले जाते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गावठी संबोधल्याने त्याला एक प्रकारचा न्यूनगंड येतो. चांगल्या कपड्यातील, इंग्रजाळलेली शहरातील माणसे पाहिली की मातृभाषेत बोलणाऱ्या शहरी माणसांनाही तुलनेने आपण गावठी असल्याचे भासत राहते. तर ग्रामीण लोकांची काय तऱ्हा होत असेल? पण, अशाच गावठी म्हणून हिणवल्या गेलेल्या व्यक्तींची बुद्धीमत्ता कमी नसते, कमी पडतो तो त्यांचा आत्मविश्वास! तेव्हा हाच गावठी शब्द अपमान नाही तर अभिमान वाटावा, असा प्रत्येकाला निखळ मनोरंजनाच्या माध्यमातून आत्मविश्वास देणारा, आर. बी. प्रोडक्शन निर्मित ‘गावठी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.