अभिजित आणि मृण्मयीच्या उपस्थितीत रंगली गप्पांची मैफिल!
फ्रांकफुर्ट (जर्मनी) : अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या उपस्थितीत ‘मामाच्या गावाला जाऊया’ हा मराठी चित्रपट शनिवारी (३१ जानेवारी) जर्मनीतील फ्रांकफुर्ट येथे प्रदर्शित झाला. चित्रपट बघितल्यानंतर अभिजित आणि मृण्मयीने मराठी रसिकांसोबत गप्पांची मैफिल रंगवली.
‘भारताबाहेर एवढा छान आणि प्रचंड प्रतिसाद पाहून खुप छान वाटले. परदेशात राहूनही तुम्ही मराठीपण टिकवून ठेवलेत त्याचा अभिमान वाटला. संपूर्ण सोहळा अतिशय उत्तम संचालित होता’ या शब्दात अभिजित खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करून आयोजक संस्था ‘मराठी कट्टा फ्रांकफुर्ट’ ला त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जर्मनीसारख्या देशात मराठी चित्रपट पोहचावा यासाठी अलीकडच्या काळात प्रयत्न सुरु झालेत. २०१४ मध्ये ‘अस्तु’, ‘फॅंड्री’ यासारखे चित्रपट फ्रांकफुर्टमध्ये दाखवण्यात आले होते. ‘मराठी कट्टा फ्रांकफुर्ट’ने फ्रांकफुर्ट येथे आयोजित केलेल्या ‘मामाच्या गावाला जाऊया’ या मराठी चित्रपटाला रसिकांचा ‘हाऊसफुल’ प्रतिसाद लाभला.
चित्रपटानंतर अभिनेता अभिजित आणि अभिनेत्री मृण्मयी यांच्यासोबत गप्पांचा कार्यक्रम देखील होता. रोज टी.व्ही.च्या माध्यमातून लोकांच्या घरात पोहचलेल्या कलाकारांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल पडलेल्या प्रश्नांना लोकांनी अभिजित आणि मृण्मयीपर्यंत पोहचवले. सगळ्या प्रश्नांची अतिशय दिलखुलासपणे उत्तर देत दोघांनीही रसिकांचे मनोरंजनदेखील केले.
चित्रपटाआधी संपदा सप्रे यांनी कलाकारांची ओळख प्रेक्षकांना करून दिली. शिल्पा गडमडे यांनी कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील संवादाचे संचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी अजित रानडे यांनी कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले. अमित मुळे, रवी देशपांडे, अमित चाफळकर, कौस्तुभ निजसुरे, सचिन दामले, आशिष पोतदार, शंतनू सप्रे, रुपाली बाठे या ‘मराठी कट्टा फ्रांकफुर्ट’ च्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावला.