ट्रेलर आणि गाण्यांनी वाढवली तरुणाईची उत्सुकता
सध्या अवघ्या तरुणाई आणि जाणकार प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे, ती `घंटा` चित्रपटाचा ट्रेलर, टीझर आणि गाण्यांची. या दणकेबाज प्रमोशनने चित्रपटाची उत्सुकता प्रचंड वाढवली असून, ही `घंटा` १४ ऑक्टोबरला राज्यभरातील वेगवेगळ्या चित्रपटगृहांत वाजणार आहे.

तरुणाईच्या विषयावरचा धमाल चित्रपट म्हणून `घंटा`ची सगळीकडेच चर्चा आहे. ‘घंटा’चा टीझर आणि ट्रेलरला `यू ट्यूब`वर आत्तापर्यंत लाखोंच्या घरात हिटस मिळाल्या आहेत. अमेय-सक्षम- आरोह या त्रिकुटाबद्दल तरुणाईमध्ये क्रेझ आहे. त्यांनी केलेल्या अभिनव प्रमोशनमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
`घंटा` हा आरोह -अमेय-सक्षम या त्रिकुटाने केलेल्या उचापतींनी भरलेला सिनेमा आहे. मुंबईत स्ट्रगल करत असेलेले हे तिघे जगण्यासाठी काय उद्योग करतात, याचं खुमासदार चित्रण दिग्दर्शक शैलेश काळे यांनी या चित्रपटात केलं आहे. तरुणाईच्या विषयावरचा, तरुणाईच्या भाषेतला हा चित्रपट असला, तरी तो सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा, असा आहे.
`दशमी स्टुडिओज`, `ब्रह्मपुरा पिक्चर्स` आणि `यलो इन्क.` यांनी हा चित्रपट सादर केला आहे. `दशमी क्रिएशन्स`ने अल्पावधीत टीव्ही क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. निर्माते नितीन वैद्य, निनाद वैद्य यांच्या या प्रॉडक्शन हाउसच्या `दुर्वा` या मालिकेने एक हजार एपिसोडसचा टप्पा ओलांडला आहे. त्यांच्या `माझे मन तुझे झाले,` `पसंत आहे मुलगी`, `कमला,` या मालिकांनाही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. `घंटा` या चित्रपटाच्या निमित्ताने ही कंपनी चित्रपट क्षेत्रातही भक्कम पाय रोवण्यासाठी सज्ज आहे.
शैलेश काळे आणि रोहित शेट्टी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुमित बोनकर आणि राहुल यशोद यांनी या हटके सिनेमाचं लेखन केलं आहे. फ्रेश लूक, धमाल प्रेझेंटेशन ही सिनेमाची वैशिष्ट्यं आहेत.