विनारिप्लेसमेंट प्रयोग करण्याची कामगिरी
आताच्या काळात नाटकांचे मोजके प्रयोग होण्याच्या काळात ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकानं ४०० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी हा पल्ला पार केला असून, आतापर्यंत या नाटकात एकही रिप्लेसमेंट झालेली नाही.

आतापर्यंत या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे. जवळपास तीन वर्षांत या नाटकानं ४०० प्रयोग केले आहेत. शशांक आणि लीना यांचं ४०० प्रयोगांचा टप्पा गाठणारं हे पहिलंच नाटक आहे.
अभिजित पेंढारकर यांनी संगीत, अमिता खोपकर यांनी वेशभूषा, प्रदीप पाटील यांनी नेपथ्य आणि रवी करमरकर यांनी प्रकाशयोजना केली आहे. ‘एकही रिप्लेसमेंट न करता ४०० प्रयोग करणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. या नाटकानं समाधान आणि आनंद अशा दोन्ही गोष्टी दिल्या. नाटक पाहिलेल्या प्रेक्षकांना आमचं खरखुरं कुटुंब वाटतं, ही आमच्या कामाची मोठी पावती आहे. चारशे प्रयोग होत असले, तरी आम्ही तितक्याच उत्साहानं काम करतो, प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच नाटकातला ताजेपणा टिकून राहतो. ४०० प्रयोग पूर्ण होणं आनंददायीच आहे,’ असं अभिनेत्री लीना भागवत यांनी सांगितलं.
‘महाराष्ट्रासह परदेशातही या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हे नाटक जितकं आपलं वाटतं, तितकंच ते परदेशातल्या प्रेक्षकांनाही वाटतं, हेच या नाटकाचं यश आहे,’ असं मंगेश कदम म्हणाले.