एपीजे अब्दुल कलाम यांचे स्मरण
व्हीईएस कॉलेज ऑफ फार्मसीतील पहिल्या वर्षामध्ये प्रेरणा दोडेजाने ब्लड कॅन्सरशी सामना केला आणि 70 वेळा केमोथेरपीला तोंड दिले. या आजारामुळे कितीही यातना होत असल्या तरी तिने शैक्षणिक उद्दिष्टे पूर्ण करण्यामध्ये बाजी मारली. त्यासाठी तिला शिक्षक, मित्रमंडळी व रुग्णालयातील स्टाफ यांची प्रचंड मदत झाली. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यासाठी, साजऱ्या करण्यात आलेल्या जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात शनिवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये सांगण्यात आलेल्या अनेक प्रेरणादायी कथांमध्ये ही एक कथा होती.

व्हीईएसच्या विविध संस्थांतील अशा दहा विद्यार्थ्यांना व्हीईएस श्रेष्ठता पुरस्कार देण्यात आले आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दाखवलेली अतुलनीय मूल्ये, साहस व हिंमत यांचा गौरव करण्यात आला. १६-२२ वर्षे वयोगटातील या विद्यार्थ्यांनी, सर्व आव्हानांचा सामना करत अभ्यास आणि त्याव्यतिरिक्तच्या उपक्रमांमध्ये चमकदार कामगिरी केली. तसेच, अन्य विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला.

स्वामी विवेकानंद कनिष्ठ विद्यालयातील सुनील मल्लाह हा दहावीतील विद्यार्थी रोज पहाटे पाच वाजता उठतो आणि शाळेत येण्यापूर्वी दूध विकायला जातो. जीवनात इतके पेच असातनाही त्याने रेसलिंग, कबड्डी अशा विविध खेळांमध्ये राज्य स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.
‘या कार्यक्रमाचे उद्दिष्ट, प्रतिकूल परिस्थितीचा सामना साहस, चिकाटी आणि आशावादाने करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोसाहन देणे, हे आहे. यामुळे आमच्या अन्य विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना व प्रतिकूल स्थितीला सकारात्मक व चिकाटीने सामोरे जाण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. अशा प्रोत्साहनपर कार्यक्रमांमुळे, आमच्या संकुलातील अन्य विद्यार्थ्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले गुण स्वतःमध्ये रुजवण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे,’ असे व्हीईएसएलएआरसीच्या संचालक प्रिया मुखर्जी यांनी सांगितले.
व्हीईएसचे सचिव दिनेश ताहिलियानी यांनी नमूद केले : ‘व्हीईएसमध्ये आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मानवी मूल्ये रुजवण्यासाठी प्रेरित करतो. एपीजे यांनी काही वर्षांपूर्वी आमच्या संकुलास भेट दिली असल्याने आम्ही त्यांची जयंती अतिशय खास पद्धतीने साजरी करायची ठरवली. त्यांच्यासोबत घालवलेल्या अमूल्य क्षणांचे स्मरण आजही विद्यार्थी आणि शिक्षकांसहित आम्हा सगळ्यांना होते आणि त्यांची मूल्ये जपण्यासाठी आम्ही सगळ्यांना प्रोत्साहित करतो. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे, त्यांचा महान वारसा पुढे नेण्यासाठी तरुण पिढीला मदत होणार आहे.”
प्रेरणादायी वक्ते पवन अग्रवाल यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना जगभर प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांच्या विश्वाची सफर घडवली.