सहा चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरू
जहांगीर आर्ट गॅलरीमध्या सहा चित्रकारांच्या कलाकृतींचे ‘पॅलेट ऑफ परस्पेक्टिव’ हे प्रदर्शन २४ ऑक्टोबरपासून सुरू झाले असून, ते ३० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहाणार आहे. या सामूहिक प्रदर्शनात गणेश सोमयाजी, गिलियाल जयराम भट, शरथ होला, जयश्री शर्मा, मुरलीधर सुवर्णा आणि डॉ. शिवप्रकाश एस एम या सहा चित्रकारांच्या कलाकृती रसिकांना पाहायला मिळणार आहेत.
चित्रकलेतील विविध छटा, माध्यमे, सौन्दर्य यांची कला मेजवानी रसिकांना या प्रदर्शनातून पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे सर्जनशीलतेचा हा उत्सव चुकवू नये असाच आहे. कला रसिकांसाठी हे प्रदर्शन सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत विनामूल्य खुले आहे.
गणेश सोमय्याजी यांचे जलरंगांसारख्या अवघड माध्यमावर विलक्षण प्रभुत्व आहे. त्यामुळे लँडस्केप आणि सीस्केप करताना या माध्यमाला लीलया हाताळून त्यांनी पर्स्पेक्टिव्हची खोली आणि सौन्दर्य एकाच वेळी विलक्षणरित्या कलाकृतीतून साकारले आहे. त्यांची चित्रे म्हणजे केवळ सौन्दर्याचे प्रगटीकरण नाही तर जागतिकीकरणामुळे किनारपट्टी आणि निसर्ग यांच्यावर होणार परिणामही आपल्याला कलाकृतीतून दिसतो आणि अंतर्मुख करतो. त्यांच्या चित्रातील मंदिरे आणि चर्च आपल्या परंपरांची आठवण करून देतात आणि निसर्गाबद्दल जागृत करतात.
शरथ होला यांची चित्रे म्हणजे वास्तववाद आणि अमूर्तता यांची सुरेख गुंफण होय. त्याचबरोबर या कलाकृती निसर्ग, संस्कृती आणि मानवी धारणा यांच्या गुंफलेल्या क्षेत्रांमधून दर्शकांना मोहक प्रवासासाठी आमंत्रित करतात.
गिलियाल जयराम भट गेली चार दशके कला साधना करत आहेत. पोर्ट्रेट आणि लँडस्केपपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आज अमूर्ततेच्या दाराशी पोहोचला आहे. मानवनिर्मित वातावरणात सौंदर्य शोधणे हे एक आव्हान आहे. भट यांची चित्रे म्हणजे या आव्हानांना सामोरे जाण्याची संधी आहे. या आव्हानांच वैशिष्ट्य म्हणजे यातून सुखद चित्रानुभूतीच रसिकांना मिळते. ही चित्रानुभती रसिकांना शांततेच्या गाभ्यापाशी पोहोचवते.
कला, शिक्षण आणि प्रवासाचा प्रचंड अनुभव असलेले, डॉ. शिवप्रकाश एस एम पोर्ट्रेट आणि सर्जनशील प्रक्रिया यांच्यातील घनिष्ठ संबंध शोधतात. मत्स्यव्यवसाय विभागातील त्याचा अनुभव प्रतिबिंबित करणारी त्यांची चित्रे विलक्षण कला अनुभूती देतात. कलात्मक अभिव्यक्तीचे उत्क्रांत स्वरूप दाखवून, वेगाने बदलणार्या जगात मानव आणि प्राणी यांच्यातील गुंतागुंतीचा परस्परसंबंध त्यांच्या कलाकृतीमध्ये दाखवला आहे.
जयश्री शर्मा या मायक्रोबायोलॉजिस्ट, प्रोफेसर आणि स्वयं-शिक्षित कलाकार आहेत.दैवी स्त्री शक्ती आणि तिचे सामर्थ्य त्यांच्या चित्रात प्रतिबिंबित होते. अलंकारिकता, सूक्ष्म तपशील, मानवी आकृत्यांचे लयदार चित्रण हे जयश्री यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य आहे. भारतीय परंपरेतील भव्य आणि दिव्यत्वाची प्रचिती कला रसिकांना जयश्री यांच्या चित्रातून पाहायला मिळते.
मुरलीधर सुवर्णा यांच्या कलाकृतीमध्ये भूविज्ञान आणि चित्रकला यांची सुरेख गुंफण पाहायला मिळते. मुरलीधर हे पोत, खडक, खनिजे आणि लँडस्केपच्या रंगछटांमधून प्रेरणा घेतात. वास्तववादी चित्रणाच्या माध्यमातून कासारगोड आणि मंगलोर प्रदेशातील निसर्ग हा त्यांची प्रेरणा आहे. भारतीय विविधता त्यांच्या चित्रांतून प्रदर्शित होते.