टीझरनंतर पोस्टर लॉन्च
चाकोरीबाहेरचे विषय हाताळणारा दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या ‘गुलाबजाम’ सिनेमाचे टीझरनंतर पोस्टरही रिलीझ झाले असून, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा आगामी ‘गुलाबजाम’ सिनेमाचे टीझर प्रदर्शित करण्यात आले होते. सोनालीने ‘माझी लाडकी गोष्ट.. राधा आणि आदित्यची.. आमच्या स्वयंपाकाची..’ असं लिहित हा टीझर पोस्ट केला होता. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर हातात लाटणं घेऊन उभी असलेली दिसत आहेत. पोस्टरमध्ये सोनालीच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत असून सिद्धार्थ मात्र थोडा चिडलेला दिसतोय.
‘चवीने खाणाऱ्यांना प्रेमाने वाढायला लवकरच रसिकांच्या भेटीला ‘गुलाबजाम’, असे कॅप्शन देऊन सोनालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे.
‘गुलाबजाम’ही लंडनमध्ये राहणा-या भारतीय माणसाची गोष्ट आहे.मराठी पारंपारिक खाद्यपदार्थ शिकण्यासाठी आदित्य म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर भारतात येतो आणि पुण्यात आदित्यची भेट राधा अर्थात सोनाली कुलकर्णीशी होते. राधा त्याला तिची कला आणि भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थची टेकनिक शिकवण्याचा निर्णय घेते. यानंतर राधा आणि आदित्यच्या सुंदर आणि अर्थपूर्ण मैत्रीची सुरुवात होते.मैत्रीचे हे नाते कसे पुढे जाते, त्यात कशी वळणे येतात हे सर्व सांगणारी कथा म्हणजे गुलाबजाम!