झी स्टुडिओजचा नववर्षातील पहिला चित्रपट
झी स्टुडिओजचा नववर्षातील पहिला चित्रपट १६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून, सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘गुलाबजाम’ची रेसिपी चविष्ट होणार आहे.
चौकटीबाहेरच्या चित्रपटांना हाताळणाऱ्या दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी पुन्हा एकदा त्यांचं दिग्दर्शन कौशल्य पणाला लावल्याचं टीझरवरून पाहायला मिळत आहे. ‘चांगल्या पदार्थाची पहिली खूणअसते त्याचा वास…’ याच ओळीने सुरुवात होणाऱ्या या टीझरमध्ये स्वयंपाकघरात असणारी पदार्थांची रेलचेल आहे. स्वयंपाक करताना एखाद्याच्या मनात कोणत्या भावना असतात, मुळात त्याविषयी प्रत्येकाचा दृष्टीकोन कसा असतो, याची झलक या टीझरमधून पाहायला मिळतेय. या टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराच्या लूकवरुन पडदा उचलला नाहीये. पण, तरीही सोनालीच्या आवाजात प्रदर्शित करण्यात आलेला ‘गुलाबजाम’चा टीझर लक्षवेधी ठरतोय.
कथेतील नाविन्य हे कुंडलकर यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य. गुलाबजाम टीझर निमित्ताने पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय येतोय.
‘गुलाबजाम’ ही लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाची कथा आहे. आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा काही खास मराठी खाद्यपदार्थ शिकण्यासाठी भारतात येतो. भारतभेटीत तो पुण्यात राहणाऱ्या राधाला (सोनाली कुलकर्णी) भेटतो. ती त्याला पारंपरिक मराठी पाककृती शिकवण्याचा निर्णय घेते. इथूनच त्यांच्या सुंदर आणि अर्थपूर्ण मैत्रीची सुरुवात होते. पण मैत्रीचे हे नाते कसे पुढे जाते, त्यात कशी वळणे येतात हे सर्व सांगणारी सुंदर कथा म्हणजे हा चित्रपट.
सोनाली, सिद्धार्थ यांच्या साथीने सचिन कुंडलकर यांच्या ‘गुलाबजाम’ला प्रेक्षकांची पसंती मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणारआहे.