हर्षदा कोळपकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुरु
पुणेस्थित सुप्रसिद्ध चित्रकार हर्षदा अरविंद कोळपकर यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रकृतींचं ‘इटर्नल जर्नी’ हे प्रदर्शन मुंबईत सुरु आहे. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, १६१ बी, एम, जी रोड, काळा घोडा, मुंबई येथे दिनांक ४ सप्टेंबर २०१७ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील.
प्रत्येक कलाकाराची सृजनशील प्रक्रिया म्हणजे त्याच्या जीवनातील विविध अनुभव, आनंद आणि दुःखाचे क्षण यांचा प्रतिबिंब असतं. चित्रकार हर्षदा अरविंद कोळपकर यांनी साकार केलेल्या चित्रकृतींमध्येही त्यांच्या अनुभवातून साकारलेली चित्रं विविध माध्यमांद्वारे रसिकांच्या भेटीला आली आहेत.

चित्रकर्तीला लहान असल्यापासून समुद्राने वेड लावलं आहे. सागराचे वेगवेगळे पैलू त्यांना नेहमीच आकर्षित करीत आले आहेत. सागर किनारे, मच्छिमार लोक, आजूबाजूला असलेल्या होड्या, गोंगाट असलेला मासळी बाजार, मासे, मासळीच्या टोपलीभोवती फिरणारे कावळे, घाईघाईत ये जा करणारे लोक अशा गोष्टींनी अनेक कलाकारांना प्रेरित केलं आहे.
सात द्वीपसमूहाचा इलाका शेवटी मुंबई म्हणून नावारुपाला आला त्या ठिकाणचे कोळी हे मूळ रहिवासी होते. त्याच मच्छिमार समाजातील स्त्रीयांची चित्रं चित्रकार हर्षदा यांनी रेखाटली आहेत. उठावदार रंगातल्या साड्या परिधान केलेल्या स्त्रीया, राखाडी, चंदेरी रंगाच्या मासळी समोर उठून दिसतात, मोकळी हालचाल करता यावी म्हणून वर खोचलेली साडी, हातात भरलेला हिरव्या रंगाचा बांगड्यांचा चुडा, कानाच्या पाळीला जड झालेल्या रिंग आणि मोठ्ठं मंगळसूत्र, नाकातली नथ आणि ताज्या फुलांचा गजरा अशी वैशिष्ट्ये या चित्रात प्रतिकात्मक रूपात साकारली आहेत.
डोक्यावर मासळीचा जड झालेला भार घेऊन बाजाराकडे निघालेल्या कोळणींचा दिवस शहर जागं व्हायच्या आधीच सुरू झालेला असतो. मोठ्याने हसत आणि उत्साहाने पण तोलसावरत जाणारी मत्स्यकन्या एखाद्या सुंदर कवितेसारखी भासते. आश्वासक भारताचं प्रतिक असलेल्या या अधुनिक नारीच्या हाती आता मोबाईलही आहे, ज्याचा उपयोग ही नारी समुद्रावर जाणार्या नाखवाशीसंपर्क साधण्यासाठी करते.
सदर प्रदर्शनात चित्रकार हर्षदा अरविंद कोळपकर यांनी पुरुषांच्या खाद्याला खांदा लाऊन मेहनतीची कामं करणार्या या मच्छिमार समाजातील बायकांमधलं स्त्रीत्व अधोरेखीत केलं आहे.