मनोज देशमुख यांच्या चित्रांचे ३१ जानेवारीपासून प्रदर्शन
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील तरुण रंगलेखक मनोज देशमुख यांनी अलीकडच्या काळात रेखाटलेल्या लॅन्डकेप कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील वरळी येथे असणाऱ्या नेहरू सेंटर कलादालनात ३१ जानेवारीपासून सुरु होत आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणाऱ्या या कलाकृती चित्ररसिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत निःशुल्क बघता येतील.


कर्जत परिसराला नैसर्गिक सौंदर्याचा साजश्रुंगार आहे. तो आपल्या कलाकृतीत मांडून, निसर्गदत्त शांतता, आध्यत्मिक तेजस्विता या कलाकृतींची बलस्थाने झाली आहेत.
मनोज देशमुख यांचा जन्म ग्रामीण भागातच झाल्याने तेथील निसर्ग, संस्कृती, जीवनशैली,आदींनी त्यांना नेहमीच भुरळ पाडली आहे.अवतीभवती असलेल्या निसर्गातील सौंदर्यानेच खऱ्या अर्थाने त्यांच्यातील कलाकार जागा केला, असेच म्हणावे लागेल. ही निसर्गाची प्रेरणादायी ऊर्जा त्यांच्यांतील कलादृष्टी प्रगल्भ करणारी ठरली. ग्रामीण जीवनातील विविध पैलू त्यांच्या मनात घर करणारे ठरले आणि मनातील भावभावांचे रंगसंचित त्यांनी कुंचल्याच्या साहाय्याने कॅनव्हासवर प्रतिबिंबित केले. रंगलेखकाच्या या प्रत्यक्ष अनुभवाचा हा कलात्मक आविष्कार रसिकांच्याही मनात नक्की घर करणारा आहे.
मनोज देशमुख यांच्या रंगलेखनाला प्रतिष्ठित संस्थांचे अनेक पुरस्कार मिळाले असून, त्यांच्या लँड्स्केपला राज्य शासनाने गौरविलेले आहे. आजवर अनेक प्रदर्शनांतून सहभागी झालेल्या मनोज यांच्या कलाकृतींची कलासमीक्षकांनी नोंद घेतली आहे. ३१ जानेवारीपासून सुरु होणारे प्रदर्शनही चित्ररसिकांसह अभ्यासक आणि कलाप्रेमींना भावणारे ठरेल, हा विश्वास त्यांच्या कलाकृतीत सामावलेला आहे.