सुभाष जमदाडे आणि सुरेश गोसावी
यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन
प्रसिद्ध चित्रकार व सुलेखनकार सुभाष जमदाडे यांच्या ‘मंत्राक्षरे’ व चित्रकार सुरेश गोसावी यांच्या ‘भक्ती आणि शक्ती’ या विषयावरील चित्रकृतींचे एकत्र प्रदर्शन २६ डिसेंबरपासून मुंबईतील जहांगीर कलादालनात सुरु झाले आहे. हे प्रदर्शन १ जानेवारीपर्यंत कलारसिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ७ या दरम्यान निःशुल्क बघता येणार आहे. दोन्ही चित्रकार पुण्याचे असून दोघांनीही पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून कलाशिक्षण घेतले आहे. आजपर्यंत दोघांचीही अनेक एकल प्रदर्शने पुणे व मुंबई येथे झाली आहेत.
सुभाष जमदाडे हे सुलेखनकार म्हणून परिचित आहेत. सुलेखनातून चित्रकृती (पेंटिंग) साकारण्याचे कलाप्रयोग ते सातत्याने करत असतात. या वेळी त्यांनी हिंदू संस्कृतीतील अध्यात्म व उपासना मंत्र यावर सर्जनात्मक आविष्कारातून विलोभनीय कलाकृती साकारल्या आहेत. ओंकार आणि गायत्री मंत्र यांचा दृश्यानुभव रसिकांना मंत्रमुग्ध करून एका उच्च अध्यात्मिक पातळीवर घेऊन जातो. चित्रातील अक्षर-आकारांची कलात्मक रचना, सुलेखनात्मक पार्श्वभूमी, रंगसंगती, रंगलेपनातील पोत, चित्रातील छायाप्रकाश, गतिमानता यामुळे कलाकृती पाहताना मनात ऊर्जात्मक भक्ती स्पंदने निर्माण होतात.
‘ओंकार’ हा एक वैश्विक पवित्र ध्वनी असून त्याचे अवकाशातील चित्रात्मक ब्रह्मांड स्वरूप पाहताना अदृश्य सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो. चित्रकाराच्या अनोख्या शैलीतील श्री गणेशाचे अदभुत अमूर्त रूप पाहताना साक्षात चैतन्याचा आविष्कार वाटतो.
सुरेश गोसावी हे चित्रकलेचे निस्सीम भक्त. जो सर्वकाही विसरून भक्तिरसात तल्लीन होऊन जातो, त्याच्या मनाला शांती लाभते आणि त्यातूनच एक नवी उमेद व उर्जा मिळते तिला आपण शक्ती म्हणू शकतो.
नैराश्यातून एकाग्रतेकडे, सुखाकडून समाधानाकडे जाण्यासाठी भक्ती आणि श्रद्धा आवश्यक असते, मग ती कोणत्याही स्वरूपातील असो. याचा प्रत्यय सुरेश गोसावी यांच्या ‘भक्ती आणि शक्ती’ या चित्र मालिकेतून येतो. कुतूहल व निरागसतेचे रूप म्हणजे लहान मुले, भक्तीचे रूप म्हणजे वारकरी, शक्तीचे रूप म्हणजे महाकाय हत्ती, श्रद्धास्थानी देवदेवतांची अनोखी रूपे अशा अनेक प्रतिकात्मक घटकांच्या सहज सोप्या मांडणीतून
प्रभावी रंगलेपनातून चित्राविष्कार पाहताना मनाला भक्तिमय, सुखद व अंतर्मुख करणारा अनुभव मिळतो. हा अनुभव सर्व कलारसिकांनी घ्यायलाच हवा.