‘जाऊंद्याना बाळासाहेब’चा शैलीदार म्युझिक लॉन्च
‘सैराट’ची झिंग रसिकमनावर अद्याप कायम असतानाच गिरीश कुलकर्णी दिग्दर्शित ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ या बहुचर्चित चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील गाण्यांवर अजय-अतुल रसिकांना पुन्हा एकदा थिरकायला भाग पाडणार आहेत.

सैराटने समाजातील वास्तवाचा जो दाहक अनुभव मांडला. तो अनुभव लोकांपर्यंत तेवढ्याच योग्य पद्धतीने प्रेक्षकांना पोहोचवला तो झी स्टुडिओज् आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी.. सैराटनंतर ही दोन्ही नावे आता पुन्हा एकदा सज्ज झाली आहेत आपल्या आगामी चित्रपट ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’साठी. झी स्टुडिओजची प्रस्तुती आणि अजय- अतुल यांचे ‘सागा प्रॉडक्शन्सची’ निर्मिती असलेल्या व गिरीश कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असून येत्या ७ ऑक्टोबरला तो महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांतील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

चित्रपटाची कथा आहे बाळासाहेब अण्णासाहेब मारणे या ग्रामिण भागातील एका युवकाची. जाऊंदे! – या शब्दाच्या आधारावर बाळासाहेब आजवर जगत आलेला आहे. सत्तेत असलेल्या राजकारणी वडिलांच्या कृपेमुळे आजवर तक्रार करावी असं त्याच्या आयुष्यात काही घडलेलंच नाहीये. रहायला मोठं घर, कामं करायला हातापायाशी नोकर, हिंडायला ड्राहव्हरसकट तैनात असलेली आलीशान गाडी. पैसा आणि राजकीय सत्ता यांमुळे आलेल्या मग्रूरीची बाळासाहेबाला चांगलीच ओळख आहे. इतकं सगळं असूनही काहीतरी बिनसलेलं आहे. राजकारणी वडिलांचा मुलगा असल्याने त्यानेही तीच परंपरा पुढे चालवावी आणि स्वत:ही नेता व्हावं अशी त्याच्याकडून अपेक्षा केली जाते आहे. पण त्याला त्याची पर्वा नाहीये. त्याच्या या स्वभावामुळेच एके दिवशी वडील त्याला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याचं आव्हान देतात. बाळासाहेबसुद्धा हे आव्हान स्वीकारुन घराबाहेर पडतो आणि इथुनच सुरु होतो शोध स्वत्वाचा. या प्रवासात बाळासाहेबाला सापडते एक वाट जी या शोधात महत्वाचं माध्यम ठरते. या नव्या शोधात, नव्या प्रवासात त्याला कोण साथ देतं ? स्वार्थी राजकारणाची खेळी करणारे वडील त्याच्या या नव्या भूमिकेचा स्वीकार करतात का ? आणि बाळासाहेबाला जगण्याचं मर्म सापडतं का? या सर्वांची गोष्ट म्हणजे ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ हा चित्रपट.

गिरीश कुलकर्णी यांची कथा पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सई ताम्हणकर, मोहन जोशी, रिमा, भाऊ कदम, मनवा नाईक, श्रीकांत यादव, किशोर चौगुले, सविता प्रभुणे आणि दिलीप प्रभावळकर अशी कलाकारांची मांदियाळी आहे. चित्रपटातून सर्वच कलाकारांच्या अभिनयातून ग्रामीण बाज आणि त्या मातीतील अस्सलपण समोर येतंय हे विशेष. हा ग्रामीण बाज आपल्या कॅमेरातून टिपलाय छायालेखक एच. एम रामचंद्र यांनी.
चित्रपटासाठी अमित घाटे यांनी कलादिग्दर्शन सांभाळलय तर वेशभूषा सचिन लोवळेकर यांनी रंगभूषा सानिका गाडगीळ तर संकलन अभिजीत देशपांडे यांनी केलंय. हा चित्रपट येत्या ७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
वर्षाच्या सुरूवातीलाच ‘नटसम्राट-असा नट होणे नाही’ आणि ‘सैराट’सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणा-या झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेला ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’ प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यास सज्ज झालाय.