जागतिक रंगभूमीदिनी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचा उपक्रम
मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या वतीने जागतिक रंगभूमीदिनाचे औचित्य साधून फ्रेंच नाटककार मिशेल अजामा लिखित, फ्रान्सचे सुप्रसिद्ध नाटय़दिग्दर्शक असील रईस दिग्दर्शित ‘जिहाद यात्रा’ (हिंदी)चा प्रयोग सादर होत आहे.
दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा व परीक्षेचा भाग म्हणून विविध शैलीतील नाटकांची निर्मिती केली जाते. त्याचा भाग म्हणून खास जागतिक रंगभूमीदिनाचे औचित्य साधून यावर्षी प्रथमच अकॅडमीच्या वतीने परदेशी नाट्यदिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेले ‘जिहाद यात्रा’चा पहिला प्रयोग २७ मार्चला सायंकाळी ६.३० वाजता सादर होणार आहे. त्यानंतर सलग तीन दिवस (२८. २९ आणि ३० मार्चला) संध्याकाळी ७ वाजता या नाटकाचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत.
मुक्ताकाश रंगमंच, लेक्चर कॉम्प्लेक्स, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथे हे नाटक मंचित होणार असून, याप्रसंगी सुप्रसिद्ध नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अकॅडमी दरवर्षी विद्यार्थ्यांसोबत नाटक दिग्दर्शित करण्यासाठी नामवंत दिग्दर्शकांना निमंत्रित करते. यावर्षी प्रथमच परदेशी दिग्दर्शकास अकॅडमीत निमंत्रित केले आहे. असील रईस हे गेली २५ वर्षे पॅरीस, फ्रान्स येथे नाटक व चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून काम करीत आहेत.
‘जिहाद यात्रा’ या नाटकाचे नेपथ्य व वेशभूषा मुनीश सप्पल व प्रकाशयोजना हरी नायर यांनी केली आहे. या नाटकात अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थी कलावंतांचा सहभाग असणार आहे. या प्रसंगी नाट्यक्षेत्रतील अनेक नाट्यदिग्दर्शक, कलावंत, समीक्षक, साहित्यिक आणि रंगकर्मी उपस्थित राहणार आहेत.
सदर नाटकाचे प्रयोग नाट्यरसिकांसाठी विनामूल्य असून, या नाटकाचा आस्वाद नाट्यरसिकांनी घ्यावा, असे आवाहन अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. मंगेश बनसोड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालय दूरध्वनी क्र. ०२२-२६५४३२०९ येथे संपर्क साधावा.