२८ फेब्रुवारीपासून प्रयोगशील रंगलेखनाचे प्रदर्शन
सुप्रसिद्ध रंगलेखिका जुही कुलकणी यांच्या प्रयोगशील रंगलेखनाचे प्रदर्शन मुंबईतील जगप्रसिद्ध जहांगीर कलादालनात २८ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. लंडन येथे कलाशिक्षण घेतलेल्या जुही यांच्या कलाकृती ६ मार्चपर्यंत कलारसिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत निःशुल्क बघता येणार आहेत.

जुही यांचा जन्म महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे झाला असून, त्यांचे कलाशिक्षण लंडनला झाले आहे. त्या सध्या बंगलोरला वास्तव्याला आहेत. जुही यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यांच्या पालकांनी हा कलाध्यास पारखला आणि त्या १३ वर्षांच्या असतानाच ऑइल पेंट, रंगीत खडू, वॉटर कलर या माध्यमात प्रभावी रंगलेखन करू लागल्या. त्या आज अनेक माध्यमात काम करत असून, त्यातही वेगळ्या प्रयोगांद्वारे आपल्या शैलीची वेगळी ओळख कमावत आहेत. जहांगीरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या कलाकृतीही याच प्रयोगाचा एक भाग आहे.


विदर्भातील वास्तव्य, त्यानंतर लंडनमधील कलाशिक्षण आणि बेंगलोरमधील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमातील वातावरणाचा सूक्ष्म प्रभाव त्यांच्या कलाकृतीतूनही डोकावतो. आयुष्यातील अशा वेगवेगळ्या बॅकड्रॉपची वैविध्यपूर्णता त्यांच्या कलाकृतींची श्रीमंत बलस्थाने आहेत.
जुही कुलकर्णी यांनी निर्मिलेल्या अनेक कलाकृती अमेरिका, लंडन, स्वीडन, मुंबई, बंगलोर, दिल्ली आणि इतर शहरातील कलारसिकांच्या खाजगी कलादालनात संग्रहित आहेत. त्यांच्या चित्रांचे लंडन, मुंबई, नागपूर, बंगलोर अशा अनेक शहरांतील कलादालनात आजवर अनेक प्रदर्शने भरली आहेत. अलीकडेच त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या बंगलोरच्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरमध्ये भरले होते. त्यांनी केलेले रंगलेखन www.juhikulkarni.com वरही उपलब्ध आहेत.
अशा या मानवी जगण्यावर व्यक्त होणाऱ्या रंगलेखिकेचे चित्रप्रदर्शन येत्या २८ फेब्रुवारीपासून जहांगीर कलादालनात सुरु होत असून ते ६ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु राहणार आहे, त्याचा कलाप्रेमींनी नक्की आस्वाद घ्यावा.