शंभराहून अधिक चित्रांची ‘कला सरला’ मालिका
‘कला सरला परिवारा’तर्फे मुंबईच्या जहांगीर कलादालनात प्रसिद्ध दिवंगत चित्रकार सरलादेवी मजुमदार यांच्या १०० हून अधिक ऐतिहासिक चित्रांचे प्रदर्शन ‘कला सरला’ या शीर्षकांतर्गत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात कलासमीक्षक, साहित्यिक व गांधीवादी विचारवंत डॉ. वर्षा दास व श्रीमती सोनल पारिख (पाचव्या पिढीतील गांधीवादी, सुप्रसिद्ध गुजराती लेखक आणि स्तंभलेखक) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. पन्नास वर्षांपूर्वीच्या या ऐतिहासिक कलाकृती कलारसिकांना दि. १२ ते १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत बघता येणार आहेत.

प्रदर्शनात काय आहे?
पन्नास वर्षांपूर्वी तयार केलेल्या या आयकॉनिक, ऐतिहासिक आणि भव्य चित्रकलाकृती ‘शिव महिम्न स्तोत्रम्’पासून ते ‘रामायण’, ‘महाभारत’ आणि ‘कृष्णा’च्या जीवनातील तत्सम प्रसंगांपर्यंत विविध विषयांवर आधारित आहेत. प्रदर्शनात चित्रांची वेगवेगळ्या गटात विभागणी केली असून, त्यात ‘जगभरातील प्रतिभावंत स्त्रिया’ या विभागासह राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाचे चित्रण करणारी एक विशेष मालिका रसिकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. यात ‘मोहन’ अर्थात मोहनदास ‘महात्मा’ कसे बनले हे मूल्य अधोरेखित करणारे आहे. या शिवाय आपल्या दैनंदिन जीवनातील साध्या, नैसर्गिक अभिव्यक्तींपासून स्वातंत्र्य, सबलीकरण असा विशिष्ट संदेश देणारी आणखी काही मनोरंजक चित्रे या मालिकेत आहेत.

सरलादेवी जन्मजात कलावंत होत्या. त्यांचा जन्म १९११ मध्ये हिंदू दिनदर्शिकेनुसार नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी झाला. त्यांना जीवनातील उच्च मूल्यांचे पालन करण्याचा वारसा त्यांचे वडील जे न्यायाधीश होते आणि उदारमतवादी विचारसरणीच्या पुरोगामी आईकडून मिळाला होता. त्या लहानपणापासूनच देशभक्त होत्या.

सरलादेवींनी वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी रांगोळी रेखाटली आणि पुरस्कारही मिळवले. विविध स्वतंत्र विषयांवर अनेक चित्रे रेखाटली. मराठी आणि गुजराती नियतकालिकासाठी त्यांनी पेन्सिल स्केचेस आणि चित्रे तयार केली होती.
महात्मा गांधींपासून प्रभावित होऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेतलेल्या सरलादेवींनी १९६९ मध्ये मुलांसाठी एक पुस्तक तयार केले, ज्यात मोहन ते महात्मा असा त्यांचा प्रवास अधोरेखित करण्यात आला. आजपर्यंत या पुस्तकाचे १५ भारतीय आणि ३ परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

१९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आले त्या वर्षाचे औचित्य साधून सरलादेवी यांनी उपनिषदांच्या काळापासून ते विसाव्या शतकापर्यंत सुप्रसिद्ध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय महिलांची २७ चित्रे रेखाटली. गेल्या काही वर्षांपासून पूर्व व ईशान्य भारत, वर्धा, मुंबई, पुणे आदी ठिकाणी सरलादेवींच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. साबरमती आश्रमात आजही त्यांच्या तीन चित्रांना कायमस्वरूपी आणि ठळक स्थान आहे.