१६ एप्रिलला उद्योजकीय परिषद
ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेले कल्याण आता लवकरच स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाणार आहे. बहुतांश कल्याणकर नोकरदार असून नोकरीसाठी ते मुंबई वा इतरत्र जातात. कल्याणकरांनी निव्वळ नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय सुरु करावा व कल्याणची उद्योगनगरी म्हणून ओळख निर्माण व्हावी, यासाठी कल्याणचे आमदार नरेंद्र पवार व तरुण उद्योजक अमित धाक्रस यांनी बिझनेस बुस्टर कॉन्क्लेव्ह-२०१७ या उद्योजकीय परिषदेचे आयोजन केले आहे.
१६ एप्रिल २०१७ रोजी कल्याणमध्ये ही उद्योजकीय परिषद होणार आहे. विशेष बाब म्हणजे या परिषदेस फ्रान्स, स्पेन आणि बेल्जियम या युरोपियन देशांचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे. युरोपियन देशांमध्ये उद्योगांसाठी असणाऱ्या संधी आणि सुविधा याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत. परदेशात उद्योगाचा पसारा वाढवू पाहणाऱ्या उद्योजकासाठी किंवा नवीन उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या भावी उद्योजकासाठी ही सुवर्णसंधी आहे. उद्योग-व्यवसाय करण्यासाठी खूप पैसा लागतो हा एक असाच गैरसमज असल्याने मराठी माणूस उद्योगाकडे वळत नाही. नेमकी हीच नस पकडून कमीत कमी भांडवलात कसा उद्योग उभारावा याचे मार्गदर्शन प्रदीप पेशकार करणार आहेत. प्रदीप पेशकार हे भाजपाच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत शासन कसे भांडवल उभारण्यास मदत करते याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत.
ही परिषद विद्यार्थी, नव उद्योजक, नवीन उद्योग सुरु करु इच्छिणारे या सगळ्यांसाठी लाभदायक आहे. परिषदेसाठी पुणे, नाशिक, धुळे या ठिकाणाहून नोंदणी सुरु झाली आहे. कल्याणकरांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परिषदेच्या नावनोंदणीसाठी अंतिम तारिख ३१ मार्च २०१७ आहे. भावी उद्योजकांनी मोठ्या संख्येने या परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ९३२३६६६२०६/ ९८२२२११८५६. कॅशलेस नोंदणीसाठी http://bbckalyan.doattend.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.