‘रंगुन’ चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी गाठली थुकरटवाडी
झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचाचं आकर्षण बॉलिवुडवाल्यांमध्ये वाढतच आहे. आजवर बॉलिवुडमधील दिग्गजांनी या मंचावरून आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी केली. या यादीमध्ये आता आणखी एका नावाची भर पडणार आहे ते नाव म्हणजे बॉलिवुडची ‘क्विन’ अशी ओळख असलेली कंगना राणावत. या मंचावर कंगना ‘लंडन ठुमकदा’ गाण्यावर नृत्य सादर करून थिरकली.

एक सशक्त अभिनेत्री अशी ओळख कंगनाला ज्या चित्रपटाने मिळवून दिली त्या ‘क्विन’ चित्रपटाची थुकरटवाडीच्या मंडळींनी सादर केलेली आवृत्ती बघून कंगनाही खळखळून हसली. याचसोबत या मंडळीसोबत कंगनाने ‘लंडन ठुमकदा’ गाण्यावर ताल धरत नृत्यही सादर केलं. विशाल भारद्वाज यांचे दिग्दर्शन असलेला ‘रंगुन’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यात कंगना मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे तर तिच्या सोबतीने शाहिद कपूर आणि सैफ अली खान असे दोन अभिनेते या चित्रपटात आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने कंगना पहिल्यांदाच एका मराठी कार्यक्रमात हजर झाली.