किशोरवयीन मुलांच्या गोष्टींचं कुतूहल
आजच्या काळातील वास्तवाचा वेध घेणारा ‘कौल मनाचा’ हा चित्रपट २१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रेड बेरी एन्टरटेंन्मेंट’ प्रस्तुत ‘श्री सदिच्छा फिल्म्स’ निर्मित ‘कौल मनाचा’ या चित्रपटात बालमनाचा वेध घेण्यात आला आहे.

किशोरवयीन मुलांना अनेक गोष्टींच कुतूहल असतं. बऱ्याचदा मोठ्यांकडून या कुतुहलाबद्दल योग्य ती चिकित्सा होत नाही. त्यामुळे आपल्या मनातील कुतूहलाविषयी जाणून घेण्यासाठी ते अनेकदा चुकीचा मार्ग चोखाळतात. याच विषयावर ‘कौल मनाचा’ या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे.
सिनेमावेडया राजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींना तो कशाप्रकारे समोरं जातो? या प्रवासात त्याला कोणाची साथ मिळते? याची रंजक तितकीच भावस्पर्शी कथा मांडणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन भिमराव मुडे यांच आहे. अनेक गोष्टीवर भुलण्याचं हे वय असतं. मुलांची मानसिक घालमेल लक्षात घेऊन योग्य-अयोग्याची जाणीव करून देणं महत्त्वाचं असतं. हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

‘राजेश पाटील’, ‘विठ्ठल रूपनवर’ व ‘नरशी वासानी’ निर्मित ‘कौल मनाचा’ या सिनेमात राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, अमृता पत्की, मिलिंद गुणाजी, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, विजय गोखले, वर्षा दांदळे, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, आशुतोष गायकवाड, गिरीजा प्रभू, निनाद तांबडे, गणेश सोनावणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा भिमराव मुडे याची आहे. पटकथा भिमराव मुडे व श्वेता पेंडसे यांची असून सवांदलेखन श्वेता पेंडसे यांनीच केलं आहे. नितीन घाग यांनी छायाचित्रणाची व संतोष यादव यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. वेशभूषा नितीन भावसार व कलादिग्दर्शन संजीव राणे याचं आहे. २१ ऑक्टोबरला ‘कौल मनाचा’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.