मानवी नात्यांची कथा सांगणारा चित्रपट
रंगभूमीपासून मालिकांपर्यंत आणि मराठी चित्रपटांपासून हिंदी चित्रपटांपर्यंत सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडण्यात यशस्वी झालेल्या ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले खोपा’ या आगामी मराठी चित्रपटात विक्रम गोखले पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
महागणपती फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या, मानवी नात्यांची कथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते जालिंदर भुजबळ असून, अर्जुन भुजबळ हे सहनिर्मिते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन डॉ. सुधीर निकम यांनी केलं आहे. नातेसंबंध हा मानवी जीवनाचा गाभा असून ‘खोपा’ या चित्रपटाची कथा याच नात्यांच्या धाग्यांनी विणलेली आहे.
एका लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. विक्रम गोखले यांनी या चित्रपटात त्या लहान मुलाच्या आजोबाची भूमिका साकारली आहे. विक्रम गोखले या व्यक्तिरेखेच्या इतके प्रेमात होते की त्यांनी वेळप्रसंगी दिवसातील सलग 15 तासही शूटिंग केलं आहे.
या चित्रपटात आपण साकारलेले आजोबा आजवरच्या आजोबांपेक्षा खूप वेगळे असल्याचं गोखले मानतात. ते म्हणतात की, हे आजोबा परक्या मुलालाही माया लावणारे आहेत. एका दुर्घटनेत अनाथ झालेल्या, पोरक्या झालेल्या मुलाला आपल्या छायेखाली घेत त्याच्यावर मायेची पाखर घालणारे आहेत. रक्ताचं नातं असलेल्या नातवांना जीव लावणारे आजोबा घरोघरी भेटतील, पण जो आपला कुणीच नाही अशा मुलाला नातवाप्रमाणे प्रेम देणारे फार कमी भेटतील. या चित्रपटात आपण साकारलेली व्यक्तिरेखा समाजातील असंख्य आजोबांसाठी आदर्श ठरावी अशी आहे. स्वतःच्या नातवंडाप्रमाणे इतरांच्या मुलांवरही प्रेम करण्याचा संदेश देणारे आहेत. याच कारणामुळे ‘खोपा’ मध्ये साकारलेले आजोबा कायम आपल्या ह्दयात बसणारे असल्याचंही गोखले म्हणतात.
चित्रपटाची स्टोरीलाईन सुरेख असून त्यावर बनविण्यात आलेला चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नसून समाजाला नवी दिशा देणारा असल्याचं मतही विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं.
या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा समाजातील कोणत्या ना कोणत्या घटकांचं प्रतिनिधीत्व करणारी असल्याचं दिग्दर्शक डॉ. सुधीर निकम सांगतात. या चित्रपटातील आजोबांच्या व्यक्तिरेखेसाठी सुरूवातीपासूनच माझ्या मनात विक्रम गोखले यांचंच नाव होतं. पटकथा लिहून पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांना ‘खोपा’ची कथा ऐकवली तेव्हा त्यांनी स्वतःच या चित्रपटात काम करायला होकार दिला आणि हवा असलेला अभिनयातील हुकूमी एक्का ‘खोपा’ला मिळाल्याचं दिग्दर्शक सांगतात.
‘खोपा’मध्ये विक्रम गोखले यांच्यासह संकर्षण कऱ्हाडे, ऐश्वर्या तुपे, यतिन कार्येकर, रूपलक्ष्मी चौगुले, भारत गणेशपुरे, आशा तारे, केतन पवार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असून सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडेकर, जालिंदर भुजबळ, दीपा गायकवाड, संजय भुरे, प्रमोद रामदासी, डॉ. सुधीर निकम, विद्या भागवत, प्रशांत तपस्वी, कस्तुरी सारंग, गौतमी देवस्थळी, विनिता संचेती, यश दौंडकर आणि ऋषिकेश बाम यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाद्वारे मराठीमध्ये प्रथमच व्हीएफएक्सचा भरपूर वापर करण्यात आला असून गिनींलाल सोलंकी यांनी व्हीएफएक्सची बाजू सांभाळली आहे. प्रविण वानखेडेहे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. समीर भास्कर यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून स्मिता फडके यांनी संकलन केलं आहे.
प्रशांत निगोजकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक आहेत, तर संदिप इनामके कला दिग्दर्शक आहेत. सतिश सांडभोर यांनी या चित्रपटातील व्यक्तिरेखांचं कॉस्च्युम डिझायनिंग केलं असून कुमार मगरे यांनी मेकअप केला आहे. संगीतकार ए. व्ही.प्रफुल्लचंद्र यांनी या चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवला आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी विजय गवंडे यांनी सांभाळली आहे. राशी बुट्टे या चित्रपटाचे साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत, तर मानस माळी यांनी या चित्रपटाचं साऊंड डिझाइन केलं आहे.