शुभारंभाचा प्रयोग २ ऑक्टोबरला एनसीपीएमध्ये
शंकर शेष फाऊंडेशन प्रस्तुत, श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान निर्मित ‘कोमल गांधार’ हे नाटक २ ऑक्टोबरला रंगभूमीवर येत असून एक्सपेरीमेंटल थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉइंट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पहिला शुभारंभाचा प्रयोग दुपारी ४ वाजता सादर होणार आहे.

डॉ. शंकर शेष यांनी या नाटकात महाभारतातील गांधारीच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला आहे. गांधारीचं निरागस कोमल स्वप्नाळू रूप, धृतराष्ट्राच्या अंधत्वाची जाणीव झाल्यावर विद्रोही बनतं. डोळ्यावर पट्टी बांधून ती पुरुषाच्या स्त्रीला दासी समजण्याच्या परंपरेला विरोध करते. ती परंपरा तोडून तिथून निघुन जाण्याचा विचारही करते. परंतु ती संस्कारशील, जीवनमूल्यांचा विचार करणारी व दोन्ही घराण्यांचे नावं कलंकित होऊ नये असा विचार करणारी, परंतु तेजस्वी स्त्री आहे. तिने जन्मभर आपली पट्टी सांभाळली. धृतराष्ट्राच्या विनवण्यांना अमान्य केले. त्यामधून तिचं दृढनिश्चयी व्यक्तिमत्व समोर येतं. परंतु दुर्योधनाच्या जन्मानंतर धृतराष्ट्र तिला पट्टी सोडायला सांगत नाही. त्यावेळी ती व्याकूळ होते. शेवटी तरुण दुर्योधनाला बघण्याचा मोह तिला होतो. तिचं मातृत्व तिच्या दृढ व्यक्तित्वाला नमवतं आणि गुपचुप ती त्याला बघते. परंतु अखेरच्या क्षणी ती हे सत्य धृतराष्ट्राला सांगून त्याची क्षमा मागते.
डॉ. शंकर शेष यांनी नाटकातील प्रत्येक पात्राच्या अंतर्मनाचा शोध घेऊन काहीतरी वेगळा दृष्टीकोण मांडायचा प्रयत्न केला आहे. म्हणुनच या नाटकातील त्यांचं प्रत्येक पात्र परंपरेपेक्षा वेगळं दिसतं. संजयचं तटस्थ रहाणं. भीष्माचं कर्तव्य पालन अतिशय कठोरपणे करणं, फक्त राजकीय दृष्टिकोणातून विचार करणं त्यांच्या पराक्रमाचा हस्तिनापूरच्या सामर्थ्याचा, समृद्धीचा धाक सगळं काही आपल्यासमोर एक वेगळंचं चित्र निर्माण करतं.
