सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची अपेक्षा
कोकणामध्ये पर्यटनाचा विकास अधिक प्रभावी आणि उत्तम होण्याच्या दृष्टीने कोकणातील उद्योजकांनी पर्यटनाच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याचा मास्टर प्लॅन तयार करावा, यासाठी शासन स्तरावर जे सहकार्य आवश्यक आहे ते आपण नक्कीच करु, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी दिले.

केरळला लाभलेल्या निसर्ग सौंदर्याच्या वरदानामुळे केरळचे पर्यटन उत्तम प्रकारे विकसित झाले. याच धर्तीवर कोकणाचा विकास व्हावा अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली.

कोकणामध्ये पर्यटन आणि उद्योगाच्या माध्यमातून उद्योजकांनी आपले व्हिजन प्रत्यक्ष उतरविण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक असणारे सर्व सहकार्य आपण करु असेही आश्वासन तावडे यांनी दिले. यावेळी कोकणाच्या पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना कोकण पर्यटन भूषण हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.