‘कृतांत’मध्ये साकारणार पुन्हा एक आव्हानात्मक भूमिका
संदीप कुलकर्णी ‘कृतांत’ या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सदैव निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा आणि निसर्गप्रेमी अशी ही भूमिका आहे.

दत्ता भंडारे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. या चित्रपटातील भूमिकेबाबत बोलताना संदिप म्हणाले की, तसं पाहिलं तर ‘कृतांत’ या शीर्षकावरून या चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावणं कठीण आहे. हेच या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्टय आहे. कथेबाबत जास्त काही सांगता येणार नाही, परंतु या चित्रपटाचा विषय आजच्या धावपळीच्या व्यावहारिक जीवनाशी अनायसे जुळून आलेला तात्त्विकतेचा संबंध अधोरेखित करणारा असल्याचं मात्र नक्की सांगेन. ‘कृतांत’मध्ये मी साकारलेली व्यक्तिरेखा शब्दांत सांगणं तसं कठीण असून इतक्यात ते सांगून त्यातील रहस्य उलगडणं ठीक नाही. भूमिका निवडताना मी नेहमीच चोखंदळ असतो. एका प्रकारच्या भूमिकेत मी पुन्हा कधीच दिसलो नाही. ‘कृतांत’ची ऑफर स्वीकारतानादेखील याची काळजी घेतली आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी असेल हे वेगळ सांगण्याची गरज नाही. नातेसंबंध आणि आजचं जीवन हा या चित्रपटाचा गाभा असून तोच खरा या चित्रपटाचा नायक आहे असं माझं मत आहे. या चित्रपटाची कथा आजच्या काळातील असल्याने प्रत्येकाला ती आपलीशी वाटेल, प्रत्येकजण त्यातील व्यक्तिरेखेच्या जागी स्वतःला पाहिल आणि हेच या चित्रपटाचं यश असेल असं मतही संदिपने व्यक्त केलं.

संदीप कुलकर्णी यांच्यासोबत या चित्रपटात सुयोग गोरहे, विद्या करंजीकर, सायली पाटील, वैष्णवी पटवर्धन आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. विजय मिश्रा या चित्रपटाचे केमेरामन असून दत्ताराम लोंढे कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी पार पाडत आहेत.