पूजा सावंतची प्रमुख भूमिका असलेला भयपट
‘एकच खेळ लपाछपीचा..’ असे गाणे गुणगुणणारी कावेरी आणि ती तीन मुलं आठवली, की आजही अंगावर सर्र काटा उभा राहतो. भूतांचा हा लपंडाव संपूर्ण महाराष्ट्रात आजदेखील मोठ्या उत्साहात पाहिला जात आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार विशाल फुरिया दिग्दर्शित ‘लपाछपी’ सिनेमाने नाबाद ५० दिवस पूर्ण केले आहेत.
एरव्ही सिनेमागृहात दोन किवा जास्तीतजास्त तीन आठवड्यांतच गाश्या गुंडाळणाऱ्या मराठी चित्रपटाच्या यादीत ‘लपाछपी’ हा सिनेमा अपवाद ठरला आहे.

‘लपाछपी’ सिनेमाला मिळत असलेल्या या घवघवीत यशाबद्दल प्रस्तुतकर्ते सुर्यवीरसिंग भुल्लर यांनी आपल्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. ‘मराठी सिनेमांना सुगीचे दिवस आले असले तरी, हॉरर सिनेमाला हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. बॉलीवूड भयपटांचीसुद्धा हीच दशा आहे. मात्र, ‘लपाछपी’ सिनेमाच्या यशामुळे भारतातील हॉररपटांनादेखील सुगीचे दिवस येतील’ असा विश्वास भुल्लर व्यक्त करतात.