गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक उत्तम सिंग यांना सन २०१६ या वर्षाचा राज्य शासनाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने बुधवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय मंदिर येथील आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ संगीतकार खय्याम आणि ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांच्यासह सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तावडे म्हणाले की, संगीत क्षेत्रात मंगेशकर कुटुंबियांनी दिलेले योगदान पाहता महाराष्ट्रात मंगेशकर स्कुल ऑफ म्युझिक सुरु करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे, यासाठी मंगेशकर कुटुंबिय आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे सहकार्य घेतले जाईल.
यावेळी पुरस्कार विजेते उत्तम सिंग यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लता मंगेशकर पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी एक आशीर्वाद असून आज मी स्वतःला लतारत्न असल्याचे मानतो. गेल्या ७० वर्षात आजपर्यंत अनेकांना लतादीदींबरोबर काम करण्याची इच्छा होती, पण मी एक असा भाग्यवान आहे की मला लता दीदींचा हा आशीर्वाद प्रत्येक चित्रपटासाठी मिळाला. या पुरस्काराच्या निमित्ताने मी, माझे आई-वडील माझे गुरु, माझे सर्व सहकारी यांचे आभार मानतो. या पुरस्कारामुळे मी खऱ्या अर्थाने आज धन्य झालो, असे सांगून उत्तमसिंग यांनी राज्य शासनाचे व पुरस्कार समितीचे आभार मानले.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र असे आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी हा पुरस्कार राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात येतो. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने उत्तम सिंग यांच्या नावास अनुमोदन दिले. या समितीत सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, संगीतकार श्रीधर फडके, गायिका आशा खाडिलकर, गीतकार स्वानंद किरकिरे, संगीतकार अजय व अतुल गोगावले आणि गायिका श्रेया घोषाल यांचा समावेश होता.
या पुरस्कार सोहळयाच्या निमित्ताने ʻदिल तो पागल हैʼ हा लोकप्रिय गाण्यांचा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. या संगीत कार्यक्रमाचे संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले होते तर संहिता आणि निवेदन दीप्ती भागवत यांचे होते. हषिकेश रानडे, आर्या आंबेकर, जयदिप बगवाडकर, मधूरा कुंभार आणि इतर गायक निवेदक यांच्यासह ३५ कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते.