१० नोव्हेंबरपर्यंत बघता येणार चित्रप्रदर्शन
दिल्लीतील सुप्रसिद्ध कलाकार एस.सी. अहुजा यांनी अलीकडच्या काळात रेखाटलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन ४ नोव्हेंबरपासून हॉटेल लीलाच्या ‘लीला कलादालनात सुरु झाले असून, ते १० नोव्हेंबरपर्यंत दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत कलारसिकांना विनामूल्य बघता येणार आहे.

एक कलाकार म्हणून समाज जीवनाकडे ते वेगळ्या नजरेने बघतात आणि त्यातील जीवनरंग आपल्या कलाकृतींमध्ये बंदिस्त करतात. या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येणाऱ्या कलाकृतींमध्येही हेच सूत्र रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या चित्रांमध्ये त्यांनी त्यांच्या समृद्ध कलात्मक नजरेतून मानवी जीवनाचे हावभाव रेखाटले आहेत.
अहुजा हे आपल्या कलाकृतींना अभिव्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम समजतात. तो त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या संवेदनशील रंगलेखकाने कोळसा आणि पेन्सिलच्या माध्यमातून रेखाटलेल्या या कलाकृती रसिकांना गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. एकाच कलाकृतीत विविध भावभावनांचा आलेख हे त्यांच्या या कलाकृतींचे बलस्थान आहेत.
अध्यापन शास्त्राचा डिप्लोमा घेतल्यानंतर अहुजा यांनी फाईन आर्टस्मध्ये (BFA) पदवी संपादन केली. त्यानंतर फाईन आर्टस्मध्येच त्यांनी शिल्पकलेत मास्टरीही (M.F.A.) मिळवली. त्यांना केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले असून, अलीकडेच प्रफुल्ला डहाणूकर सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान झाला आहे.
अहुजा यांच्या कलाकृती अनेक प्रतिष्ठित कलादालनांच्या संग्रहात ठेवण्यात आल्या आहेत. या कलाकृतींनी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्लीचे साहित्य कला परिषद, ललित कला अकॅडमी, एअर इंडिया लंडन आणि हॉंगकॉंग, मुंबईचे ओकॉर्ट अँड कंपनीसह सिंगापूर, यूएसएमधील कलादालनेही सजली आहेत. अशा या प्रतिभावंत कलावंतांच्या कलाकृती पाहण्याची संधी मुंबईकर रसिकांना मिळणार आहे.