माधवी जोशी यांच्या चित्रकलाकृतींचे प्रदर्शन
सुप्रसिद्ध चित्रकर्ती माधवी जोशी यांचे ‘द चाईल्डहूड स्टोरीज’ हे चित्र प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात २७ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. ३ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन कला रसिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत नि:शुल्क बघता येईल.
मानवाच्या थक्क करणाऱ्या प्रतिभेतून जे कला प्रकार उदयास आले त्यापैकी सर्वात प्रभावी कलाप्रकार म्हणजे चित्रकला होय. निसर्ग आणि देवत्वाच्या जवळ पोहोचवणारी चित्रकला त्यामुळे कायम निसर्गामधून प्रेरित होऊन येते.
माधवी यांचे कलेचे शिक्षण (बी. एफ. ए.)पुणे युनिव्हर्सिटी मधून झाले. माधवी यांची आत्तापर्यंत २५ पेक्षा जास्त एकल प्रदर्शने झाली आहेत. तर १०० पेक्षा अधिक समुह प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला आहे. याचबरोबर त्यांनी समाजोपयोगी कार्यासाठी आपली चित्रे दान केली आहेत.
माधवी या प्रामुख्याने आपल्या चित्रांमधून हिंदू देवदेवतांना कॅनव्हासवर आपल्या शैलीतून मांडतात. प्रस्तूत ‘द चाइल्डहुड स्टोरीज’ या चित्र प्रदर्शनात सध्याच्या काळाशी सुसंगत असे संवेदनशील विषय कॅनव्हासवर मांडले आहेत. या प्रदर्शनात माधवी यांनी जीवनातील, बालपणातील दोन बाजू आनंद व दुःख चित्रांमधून मांडल्या आहेत.
विषयाची अदभूत मांडणी, फॉर्म्सचा नेमका आणि नाट्यमय वापर यामधून त्यांनी बालपणातील कष्टमय जीवन आणि तरीही साध्या साध्या गोष्टींमधून मिळणारा आनंद नेमकेपणाने कॅनव्हासवर चित्रित केला आहे. त्यामूळे जोशी यांची हि चित्र मालिका बालपणाशी निगडीत संवेदनशील पण व्यक्त करण्यास कठीण विषय अतिशय तरलपणे, प्रभावीपणे रसिकांसमोर मांडते.
अनेकांचे बालपण हे मोठ्या कष्टातून गेलेले असते तर काहींचे बालपण मोठ्या आनंदात आई वडिलांच्या आश्रयात गेलेले असते. बालपणातील कोवळ्या मनाला हे आघात सोसणे फार जड जाते. पुढे प्रौढ वयात माणूस हे कष्टमय दिवस विसरण्याचा प्रयत्न करतो पण मनाच्या कप्प्यात कुठेतरी त्या आठवणी ताज्या राहतात. त्यामुळे मानसशास्त्रीय आणि भावनात्मक दृष्टया बालपण हा खूप संवेदनशील विषय असतो. तो कला प्रकारात हाताळणे सोपेही नसते. पण चित्रकार माधवी यांनी आपल्या चित्रातून हा अवघड विषय संवेदनशीलपणे मांडण्याचे शिवधनुष्य लीलया पेलले आहे.
माधवी जोशी यांच्या मते निसर्ग हाच एक कलेचा अद्भूत नमुना आहे. पृथ्वी, अवकाश, जीव, दैवी निसर्ग यांच्यातील शक्ती चित्रकाराच्या कल्पकतेला चालना देणाऱ्या असतात. त्यामुळे निसर्गाकडे पाहिले की चित्रकाराला नेमकेपणाने विषय सुचतात आणि ते कलाकृतीत मांडले जातात.
बालपणासारख्या संवेदनशील विषयामुळे माधवी यांचे हे प्रदर्शन चित्तवेधक आहेच, पण त्याचबरोबर रेषा, भौमीतिक आकार, रंग यासारख्या चित्र यशस्वी करणा-या घटकांचा वापर त्यांच्या चित्रांमध्ये दृश्यात्मक नाट्यमयता आणते. आणि हा त्यांच्या चित्रांचा आत्मा आहे.
प्रस्तूत प्रदर्शन हे कला रसिकांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहील. एका वेगळ्या आणि संवेदनशील विषयावरील चित्रे अनुभवण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार हे निश्चित.