बकेट लिस्टच्या शूटदरम्यान बाईक रायडिंग
आगामी बकेट लिस्ट या मराठी सिनेमात पुणेरी गृहिणी साकारणारी माधुरी तळजाई परिसरात सुपर बाईकवर मनसोक्त हिंडताना दिसली… निमित्त होतं या चित्रपटाच्या शूटींगचं… पुण्याच्या प्रभात रोडवर सुरू असणाऱ्या शूटींगदरम्यान जीन्स, व्हाईट शर्ट आणि गळ्यात निळा स्कार्फ अशा वेशभूषेत ही हास्यसम्राज्ञी व्हॅनिटीतून बाहेर आली आणि तिची एक झलक पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या तुडुंब उत्साहानं भारलेला तो परिसरच ‘माधुरीमय’ झाला.

चित्रपटाच्या शूटींगसाठी पुण्यात अवतरलेली ही अप्सरा आपल्या आठवणींमध्ये चांगलीच रमली. याविषयी सांगताना आपल्या भावंडांबरोबर पुण्यात धमाल उडवून दिल्याचं ती म्हणाली. याविषीयी पुढे बोलताना, “पर्वती, शिंदेछत्री अशा पुण्यातल्या कितीतरी ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिल्या. आम्ही भावंड इथं वेड्यासारखे भटकलोय आणि चिंचा, बोरं, करवंदांवरही ताव मारला” असं ती म्हणाली.
पुण्याच्या साने कुटुंबातील गृहिणीच्या भूमिकेत माधुरी आपल्याला दिसणार असून एकाचवेळी बऱ्याच भूमिका सक्षमपणे पार पाडणाऱ्या गृहिणींचं प्रतिनिधित्त्व ही हास्यवदना करते आहे. आपल्या या भूमिकेसाठी पुणेकरांचा हजरजबाबीपणा आणि टोमणेदार विनोदी बोलणं आपण आत्मसात केल्याचंही तिने म्हटलं आहे.
या बकेट लिस्ट सिनेमाच्यानिमित्ताने रसिकांना नेहमीपेक्षा वेगळी माधुरी पाहायला मिळणार असल्याचं दिग्दर्शक तेजस विजय प्रभा देऊस्कर यांनी म्हटलं आहे. “माधुरीची हिरोईनची इमेज बाजूला ठेवून त्यांना या सिनेमातल्या भूमिकेसाठी डी-ग्लॅम लूक आम्ही दिला. या लूकमध्येही त्या खूप सुंदर दिसत असल्याचं म्हणत भूमिकेसाठी सर्वस्व ओतून त्यांनी काम केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माधुरीची ही वेगळी छवी चाहत्यांना नक्की आवडेल, असा विश्वासही दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी दाखवला आहे.”
ब्लु मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित ‘बकेट लिस्ट’ या सिनेमाची कथा दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.