गाण्याची म्युझिकल ट्रीट असलेला सिनेमा
कोकणचं निसर्गरम्य सौंदर्य, चार मित्रांची अनोखी मैत्री, तरुणाईच्या उंबरठ्यात पाय ठेवताना हळुवार उमलणारं प्रेम आणि अति उत्साहात एका चौकडीची उडालेली धांदल असं एकंदरीत कथासार असलेला ‘मेमरी कार्ड’ हा सिनेमा येत्या २ मार्च २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

ऍडलिब्स प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शन आणि संगीत प्रितेश कामत -मितेश चिंदरकर या गोड जोळीने केले आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात दाखल झालेल्या प्रितेश-मितेश यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.
सिनेमाची कथा मनाली काळे आणि श्याम सामंत यांनी लिहिली आहे. अभिनेता संजय खापरे आणि सुनील तावडे यांना देखील या सिनेमात पाहण्याचा योग येणार आहे. त्याचबरोबर रिषभ पुरोहित, विभूती कदम, अपूर्वा परांजपे, प्रणाली चव्हाण, आदित्य नाकती, कुणाल शिंदे, हितेश कल्याणकर, दिनेश पाटील, कल्पना बांदेकर, विजय चव्हाण, अक्षता कांबळी या नवोदित कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाचं संकलन विजय कोचीकर, कला दिग्दर्शन प्रवीण चिंदरकर, छायांकन देवेंद्र तन्वर यांनी केलं आहे. साध्या गोष्टीवर बेतलेल्या या सिनेमात अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत ज्या आपण सहज आपल्या आयुष्याशी जोडू शकतो. कोकणातील एका लहान गावात दहावीपर्यंत शिकलेला मुलगा कॉलेजसाठी मोठ्या शहरात आल्यावर त्याची होणारी चलबिचल तर दुसरीकडे अजिबात ओळख नसताना एखादी मुलगी नव्याने शहरात आलेल्या आपल्या मित्राला किती सहज मनमोकळं व्हायला मदत करते अशा अनेक गोष्टी सिनेमाची रंगत वाढवतात. मुळात कथा या सिनेमाचा हिरो आहे असं म्हंटलं तरी वावगं ठरू नये. येत्या व्हॅलेंटाइन्स डे च्या निमित्ताने आपल्या व्हॅलेंटाईनला गिफ्ट म्हणून हे मेमरी कार्ड नक्की देऊ शकता.
सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या धडाकेबाज आवाजातील गणपती बाप्पाचं खास गाणं आणि पुण्यकर उपाध्याय याचा एनर्जेटिक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. गायिका मयुरी नेवरेकर यांनी जीवलग दोस्तांची यारी दोस्ती दाखवणारे क्लिक…क्लिक… हे गाणं गायलं आहे, हळुवार प्रेमाचा ‘रुण झुण’… नाद ऐकवणारे गायक जावेद अली आणि गायिका महालक्ष्मी अय्यर तसेच जावेद यांनीच ‘लाज वाटते’ जावेद यांनी या दोन गाण्याला स्वरसाज चढविला आहे. गायिका सायली पाटील हिच्या सुमधुर आवाजतील ‘डोळ्यातल्या आसवांना’ या अप्रतिम गाण्याची म्युझिकल ट्रीट असलेला मेमरी कार्ड सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात २ मार्च २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.