गोव्याच्या लोकजीवनाचे मोहक चित्रमय दर्शन
गोवा येथील सुप्रसिद्ध चित्रकार मोहन नाईक यांच्या ‘रस्टिक ऱ्हाप्सोडी’ हे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे दि २३ ते २९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान आयोजित आहे. या प्रदर्शनात रसिकांना गोव्याच्या ग्रामीण जीवनाचे सुंदर आणि मनमोहक दर्शन होईल.
अनेकदा आपल्यासमोर गोव्याचे चित्र हे बीच आणि पार्टी एवढेच मर्यादित असते. पण या वरवरच्या चित्रापलीकडे अद्भुत आणि संपन्न अशा निसर्गाने नटलेला पवित्र ग्रामीण गोवा वसलेला आहे. या ग्रामीण गोव्यातील निसर्ग आणि तिथल्या माणसांच्या साध्या सोप्या जीवनाचे दर्शन नाईक यांच्या चित्रातून रसिकांना पाहायला मिळते. नाईक यांची चित्रे म्हणजे पशुधन आणि मानवी जीवन यांच्या समरसतेचे सुरेख चित्रण आहे. हा वेगळाच असा गोवा बघून रसिकांना काही नवीन आणि अद्भुत पाहिल्याची अनुभूती मिळते.
मोहन नाईक यांनी १९८९ मध्ये गोवा कॉलेज ऑफ आर्ट, बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ फाइन आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुठलाही समांतर व्यवसाय न करता त्यांनी पूर्ण वेळ चित्रकार म्हणून काम सुरू केले. तीन दशकांपासून चित्रकार म्हणून मोहन नाईक यांनी देश विदेशात आपली ओळख यशस्वीपणे तयार केली आहे. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कला शैलीमुळे अल्पावधीतच ते चित्रकार म्हणून झाले. मोहन नाईक यांनी चित्रशैली ही वास्तववादी आणि आधुनिक चित्रशैली यांचा सुरेख संगम आहे. त्यांची देश आणि परदेशात आयोजित झालेल्या अनेक चित्र प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला आहे. ज्यामध्ये द फ्लाइंग डचमन, गॅलेरिया रॅलिनो आणि गोव्यातील आर्ट चेंबर यासारख्या महत्वपूर्ण प्रदर्शनाचा सहभाग आहे. ऑक्सफर्ड इंडिया लिमिटेड आणि क्राई आर्चिस लिमिटेड या संस्थेतर्फे त्यांना चित्रकलेतील कार्यासाठी गौरवण्यात आले आहे.
मोहन नाईक यांची विशिष्ट शैली आणि त्यांच्या कलाकृतीतून गोव्यातील माणसांची, तिथल्या निसर्गाची गोष्ट सांगण्याची हातोटी यामुळे ही चित्रे मनमोहक आणि देखणी भासतात. त्याचबरोबर या चित्रांमध्ये केवळ सौन्दर्याची अनुभूतीच होत नाही तर हळू हळू मनुष्य निसर्गापासून आणि गावाच्या निरागस जीवनशैलीपासून दुरावत चालला आहे याची जाणीव होते. त्यामुळे एकाचवेळी सौन्दर्य दर्शन आणि जीवनाचा संदेश मोहन नाईक आपल्या चित्रांमधून साधतात. रसिकांना विचार करायला प्रवृत्त करतात.
नाईक यांच्या चित्रांमधील तेजस्वी रंगांचा वापर कलाकृतीला खुलवतो. त्याचबरोबर मानवी आकृत्यांची प्रमाणबद्धता, चित्रकृतींची लयबद्धता हे काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे प्रचलित गोव्यापेक्षा वेगळा आणि निसर्गमय गोव्याची चित्राच्या माध्यमातून ओळख करून घेण्यासाठी आवर्जून हे प्रदर्शन पाहण्यासारखे आहे. हे चित्र प्रदर्शन सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत विनामूल्य खुले राहील.