मुकेश पारपियानी यांच्या छायाचित्रकलाकृतींचे प्रदर्शन
सुप्रसिद्ध छायाचित्रकार मुकेश पारपियानी यांचे “द लिगसी” हे छायाचित्र प्रदर्शन दि १७ ते ३० जानेवारी २०२४ दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी, टेरेस गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. ते सर्वांना रोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत विनामूल्य बघता येईल.
मुकेश पारपियानी हे मुंबईस्थित प्रसिद्ध फोटो जर्नालिस्ट आहेत. द डेली, इंडियन एक्सप्रेस, मिड डे यासारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांसाठी त्यांनी छायाचित्रकार तसेच फोटो एडिटर म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. या संस्थांसाठी काम करताना त्यांचा दीर्घ अनुभव पाहून त्यांना निवृत्तीनंतर पिरामल आर्ट गॅलरीचे प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
प्रख्यात छायाचित्रकार मुकेश पारपियानी ह्यांचे विविध संकल्पनांवर आधारीत छाया चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, टेरेस गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे १७ ते ३० जानेवारी २०२४ या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
मुंबईस्थित सुप्रसिध्द छायाचित्रकार मुकेश पारपियाणी ह्यांनी द डेली, इंडियन एक्स्प्रेस, मिड डे सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांसाठी छाया चित्रकार व फोटो एडिटर म्हणून अनेक वर्षे काम केले. नंतर राष्ट्रीय कला संस्थेतील NCPA पिरामल आर्ट गॅलरी येथे त्यांनी अनेक प्रदर्शने / ग्रुप शोज वगैरेंचे आयोजन केले. तसेच २००९ पासून जवळजवळ १४ वर्षे त्या गॅलरीचे मुख्य म्हणून त्यांनी काम केले आणि आपल्या अनुभवाचा व तंत्रज्ञान कौशल्याचा लाभ अनेक होतकरू छायाचित्रकारांना देऊन त्यांना ह्या क्षेत्रात पुढे जाऊन प्रगती करण्याची प्रेरणा व उत्तेजन दिले.
नित्यजीवनातील अनेक प्रसंगाचे एक संवेदनशील छायाचित्रकार म्हणून अवलोकन करून ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांनी प्रदर्शनातून नेहमी मांडले. ह्या मागील त्यांची भूमिका म्हणजे सामान्य जनांना त्या घटनांचे व ऐतिहासिक वस्तूस्थितीचे सत्य दर्शन घडविणे तसेच त्याच्याशी निगडित अशा भावविश्वाचे आपल्या वैशिष्टयपूर्ण शैलीत सादरीकरण करून सर्वांना ती वस्तुस्थिती अवगत करून देणे ही होय.
वलयांकित व नामवंत व्यक्तीचे भावदर्शन करीत असताना त्यांची प्रतिष्ठा व त्यांचे जनमानसातील असणारे स्थान ह्यांना त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे अमिताभ बच्चन, शरद पवार, बॅ. अंतुले शहनाई नवाझ उस्ताद बिस्मिल्ला खान,अरुण गवळी वगैरेंचे त्यांनी केलेले भावपूर्ण सादरीकरण सर्वसामान्य लोकांना भावले आणि त्यांची प्रशंसा मिळवली तसेच जनसामान्यांना भावणारे विषय जसे गणपती विसर्जन व ती मूर्ती विसर्जन करताना घेतली जाणारी गणेश मूर्तीची विशेष काळजी, सिद्धिविनायक चरणी अमिताभ बच्चन यांचे नतमस्तक होणे वगैरेंचे दर्शन त्यांनी घडविले. तसेच नववधूची सासरी पाठवणी करीत असताना तिच्या मनातील भावकल्लोळ व संमिश्र भावना अशा तऱ्हेने विविध विषयांचे प्रकटीकरण त्यांनी मनोविश्लषणात्मक दृष्टिकोनातून आपल्या छायचित्रांच्या माध्यमातून केले. त्याचप्रमाणे कष्टकरी गरीब लहान मुलांचे भावविश्व दर्शविताना १५ ऑगस्ट व २६ जानेवारीच्या निमित्ताने त्यांच्या हातातील छोटे तिरंगी झेंडे व ते कोणीतरी खरेदी केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद सामान्य जणांना लष्करी जवान व त्यांचे जीवन या संबंधी असणारी उत्सुकता व ते प्रत्यक्ष समोर असल्यावर त्यांच्या मनात होणारी चलबिचल,उत्सुकता, लहान मुलांना असणारे लष्करी जवान आणि त्यांची शस्त्रे (बंदुका/पिस्तूल) ह्यासंबंधी औत्सुक्य, ऐन पावसाळ्यात ऐतिहासिक वास्तू आणि परंपरा जपणाऱ्या इमारतींचे जलमय वातावरणातील प्रकटीकरण वगैरेंचे त्यांनी छायाप्रकाशाच्या व सावल्यांचा माध्यमातून आपल्या वैशिष्टयपूर्ण शैलीत सर्वांना येथे दर्शन घडवले आहे. त्याप्रमाने येथील सांस्कृतिक जीवनातील विविध घडामोडींचे एक भावपूर्ण दर्शन त्यांनी ह्या प्रदर्शनातून सर्वांना घडवले आहे. ते फार आनंददायी आहे.
एकंदरीत ह्या प्रदर्शनाचे विविध विषयावरील प्रसंगांचे व पारंपारिक तसेच वास्तववादी घटनांचे भावपूर्ण सादरीकरण सर्व दर्शकांना अनुभवता येईल आणि त्यामुळे सर्वांना दृष्यानंद लाभून एक आगळीवेगळी अनुभूती लाभेल हे निर्विवाद.