पुणे येथील प्रसिद्ध रंगलेखिका मुसर्रत मास्टर्स यांनी अलीकडच्या काळात रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन अंधेरी पूर्व येथील हॉटेल द लीलाच्या कलादालनात १६ डिसेंबरपासून सुरु झाले आहे.२२ डिसेंबरपर्यंत सकाळी १० रात्री १० या वेळेत कलारसिकांना या कलाकृतींचा आस्वाद घेता येणार आहे.
मुसर्रत मास्टर्स यांच्या रंगलेखनात असलेला फोर्स या कलाकृतींचे वैशिष्ट्य असून, त्यासाठी त्यांनी घोड्यांचा प्रतीकात्मक वापर उत्तमरीत्या केला आहे. घोडा आणि काही कलाकृतीत स्त्री व्यक्तिरेखा दिसतात आणि त्या गतिमानतेशी नाते विणतात. घोड्यांचे धावणे असो की स्त्रियांचे जगणे असो, यात वेगवेगळे अडथडे हे असतातच. ते अडथडे पार करण्यासाठी रंगलेखिकेने कॅनव्हासवर रेखाटलेला फोर्स परिणामकारकता दर्शविणारा आहे. ही चित्रे बघताना त्या कलाकृतीतील अडथडे कलारसिकांनाही गुंतवणारे आहे, हेच या चित्राचे खरे बलस्थान आहे. या चित्रामंध्ये वेगवेगळ्या भावभावनांचे दर्शन होते. सांस्कृतिक समृद्धता अधोरेखित होते. ऊर्जा, सौंदर्य आणि तोल याचा विलक्षण समन्वय या कलाकृतीत दिसतो. मुसर्रत यांच्या या कलाकृतीतील शक्तिशाली स्ट्रोक मोहक आणि तेवढेच अर्थपूर्ण आहेत.
मुसर्रत यांच्या चित्रांचे आजवर पुणे, मुंबई, बंगलोरसह दुबई, लंडनमध्ये अनेक प्रदर्शने भरली असून, जगभरातील अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने व खासगी दालनात त्यांच्या कलाकृती संग्रहित ठेवण्यात आल्या आहेत.