लेखक, दिग्दर्शक एन. रेळेकर यांची खास मुलाखत
आपल्या कलेवर जडलेली प्रिती आणि त्या प्रितीखातर त्या कलाकाराने केलेला संघर्ष याची कथा येऊ घातलेल्या प्रेमला पिक्चर्स निर्मित ‘छंद प्रितीचा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन – दिग्दर्शन आणि गीतलेखन अशी तिहेरी भूमिका साकारणाऱ्या एन. रेळेकर यांच्याशी मारलेल्या खास गप्पा…
‘छंद प्रितीचा’ या सिनेमाच्या मागची तुमच्या मनामधील भूमिका काय होती?

‘छंद प्रीतीचा’ या सिनेमात ज्या व्यक्तिरेखा आहेत, ढोलकीवाला, शाहीर आणि चंद्रायांच्या स्वभावाविषयी थोडं सांगा?
‘छंद प्रीतीचा’मधील ढोलकीवाला हा खूप शांत, सरळमार्गी, भीक मागून खाणारा जरी असला तरी स्वतःची योग्यता जपणारा असून तो ढोलकीच्या वादनात ‘पारंगत’ आहे. शाहीर हा स्वभावाने खूप चांगला आहे, पण तो एक हौशी कलाकार आहे, गाणी लिहिण्याचा त्याचा छंद आहे. आपली गाणी लोकांसमोर यावीत आणि मोठं-मोठया शाहिरांमध्ये आपलंही नाव घेतलं जावं अशी त्याची इच्छा आहे. हा एक सर्वसामान्य कलाकार असून, त्याचं लिखाण उत्तम असल्याने त्याचा बोलबाला होतो. चंद्रा हे नृत्यांगना असून तिला आई नाही. तिची आई हीसुद्धा एक तमासगीर असते आणि तिच्या आईने चंद्राला मरणापूर्वी सांगितलेलं असतं की या दुनियामध्ये काही कर, नोकरी कर, कुठेही मोल-मजुरी करून पोट भर पण पायामध्ये घुंगरू बांधू नकोस, कारण हे तमासगीर बाईचे आयुष्य काय असते ती तिच्या आईने भोगलेले आहे, ते चंद्राच्या नशिबाला येऊ नये अशी तिची इच्छा असते. पायात ‘चाळ’ बांधू नकोस हे तिच्या आईने तिला सांगितलेलं असते, पण चंद्राच्या रक्तात ‘नाच-गाणं’ भिनलेलं असल्याने तिला ते स्वस्थ बसू देत नाही आणि मूळचा स्वभाव उर्मट असल्यामुळे, मी करीन ती पूर्व दिशा असा स्वभाव असल्याने ती पायात ‘घुंगरू’ बांधून उभी रहाते आणि ‘छंद प्रीतीचा’ची कथा सामोरी येते.
पूर्वीचे सिनेमे अर्थात तमाशापटांनी, ‘सवाल-जवाब’, लावण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं… या चित्रपटात लोकसंगीताचा हा बाज कितपत अनुभवता येणार आहे?
लोकसंगीत हे महाराष्ट्राचं खरं वैभव आहे. या चित्रपटात दाखवलेले शाहीर आपल्या लेखणीतून लोकसंगीताचे विविध रंग उधळत आहेत, ज्याची झलक आपण या चित्रपटातील गाण्यांमधून अनुभवत आहातच… हा चित्रपट या रंगाची उधळण नक्कीच करेल… या चित्रपटात प्रेक्षक श्रृंगारिक लावणी, शाहीरी लावणी, प्रेमगीताबरोबरच चित्रपटात बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांच्या आवाजत रंगलेला सवाल–जवाबचा सामना ही अनुभवू शकणार आहेत.
कथेचा कालखंड किती वर्षांपूर्वीचा दाखवला आहे?
१९७५ ते १९८० च्या काळातील ही कथा… ज्यात शाहीर सत्यवान, नृत्यनिपूण चंद्रा आणि ढोलकीसम्राट राजाराम यांना आपण पाहू शकणार आहात.
चित्रपट प्रेक्षकांनी का पहावा, असं आपल्याला वाटतं?
आपल्या महाराष्ट्राचं वैभव या पिढीतल्या मुलांनी अनुभवलेलं नाही… महाराष्ट्र कलेच्या बाबतीत किती समृध्द आहे याची जाण त्यांना छंद प्रितीचा हा चित्रपट करून देईल. तर जुन्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा तोच बाज अनुभवता येणार आहे. उत्तम कथा, कथानक, संगीत, नृत्य अशा सगळ्याच बाजू जुळून आलेला ‘छंद प्रितीचा’ हा चित्रपट आहे. तेव्हा प्रेक्षकांनी जरूर या चित्रपटाची मजा लुटावी. हा चित्रपट १० नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.