मकरंद अनासपुरे सरकारी सेवेत

‘विदर्भ पिक्चर्स’ प्रस्तुत, ‘नागपूर अधिवेशन’ या चित्रपटाची निर्मिती अनिल केशवराव जळमकर यांनी केली आहे.
आपल्या अस्सल ग्रामीण लहेजाने अनेक भूमिका गाजविणारे अभिनेते मकरंद अनासपुरे ‘नागपूर अधिवेशन एक सहल..’ या मराठी चित्रपटातून सरकारी अधिकाऱ्याच्या मिश्कील भूमिकेत ९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येताहेत.
नागपूरमध्ये दरवर्षी भरणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. निलेश जळमकर लिखित – दिग्दर्शित ही एक ‘पॉलिटीकल सटायर’ फिल्म असून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या अनेक गमतीजमती या निमित्ताने मोठ्या पडद्यावर उलगडणार आहेत.


‘नागपूर अधिवेशन’ चित्रपटात शासकीय यंत्रणेच्या दबावाखाली असलेल्या सर्वसामान्य सरकारी कर्मचाऱ्याची व्यक्तिरेखा मकरंद यांनी साकारली आहे. संजय साळुंखे असे या व्यक्तिरेखेचे नाव असून अधिवेशनाच्या काळात या कर्मचाऱ्याला वरिष्ठांच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. कामावरच्या जबाबदाऱ्या व घरच्या कौटुंबिक समस्या अशा भिन्न ट्रॅक्सवर ही व्यक्तिरेखा खुलत असल्याने गमतीशीर असे संजय साळुंखे पात्र यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहे. अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांच्या फर्मानामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक शिक्षाच असते तर मंत्र्यांसाठी मात्र अधिवेशन ही एक सहल असते, असा उपरोधिक चिमटा यात काढण्यात आला आहे.
९ डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या ‘नागपूर अधिवेशन’ चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे, अजिंक्य देव, मोहन जोशी, भारत गणेशपुरे, चेतन दळवी, अमोल ताले, संकर्षण कऱ्हाडे, विनीत भोंडे, दिपाली जगताप, स्नेहा चव्हाण या कलाकारांच्या भूमिका आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे मकरंद अनासपुरे सरकारी कर्मचाऱ्यांच्या व्यथा ‘नागपूर अधिवेशन’ चित्रपटातून कशा मांडताहेत हे पाहणे नक्कीच मनोरंजक ठरणार आहे.