स्टार प्रवाहवर १० ऑक्टोबरपासून नवी मालिका
अनेक मालिकांची गाजलेली टायटल साँग गायलेल्या बेला शेंडेनं ‘स्टार प्रवाह’च्या बहुचर्चित ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’या मालिकेच्या शीर्षकगीताला आपला स्वरसाज चढवला आहे. या मालिकेच्या निमित्तानं बेलानं बऱ्याच काळानं टायटल साँग गायलं असून, सोशल मीडियात या गाण्याचं भरभरून स्वागत झालं आहे.


या मालिकेच्या शीर्षक गीताच्या निमित्तानं बेला शेंडे आणि महेश काळे हे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कलाकार एकत्र आले आहेत. या गाण्याद्वारे महेशनं संगीतकार म्हणून नवा प्रवास सुरू केला आहे.
‘अतिशय महत्त्वाचा, संवेदनशील विषय ‘नकुशी’ या मालिकेत मांडण्यात येत आहे. एक स्त्री म्हणून मला या मालिकेचा विषय फार महत्त्वाचा वाटतो. समाज म्हणून आपण पुढारलो असं आपल्याला वाटतं. वस्तुस्थिती तशी नाही. काळ बदललाय, नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. अशावेळी अनिष्ट प्रथा-परंपरांना बाजूला करायला हवं. महेशनं संगीतबद्ध केलेलं हे गाणं मला फार आवडलं. समीर सामंतचे शब्द आणि महेशच्या संगीतातून साकारलेलं अतिशय तरल असं हे गाणं गाण्याचा अनुभव माझ्यासाठी नक्कीच खास आहे,’ असं बेलानं सांगितलं.