अष्टपैलू जग्गू दादा यांची भावना
‘स्टार प्रवाह चॅनल सुरू झाल्यापासून अनेक मालिकांमध्ये मला अभिनय करण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. स्टार प्रवाह चॅनलनं मला स्टार बनवलं,’ ही भावना आहे ‘नकुशी’ या लोकप्रिय मालिकेतील चंदू ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जगन्नाथ निवंगुणे यांची!

पोलिसांच्या आयुष्यावर आधारित ‘लक्ष्य’ या मालिकेतील इन्स्पेक्टरच्या भूमिकेनं मला स्टार बनवलं. या इन्स्पेक्टरला दोन स्टार होते. मात्र, स्टार प्रवाहनं मला फाईव्ह स्टार दिले. अशोक समर्थ, आदिती सारंगधर, कमलेश सावंत यांच्यासारख्या लोकप्रिय कलाकारांसह मलाही ओळख मिळाली,’ असं जगन्नाथ निवंगुणे यांनी सांगितलं. ‘स्टार प्रवाहनं मला नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका दिल्या. नकुशी या मालिकेत मला उत्तम अभिनेत्यांसह काम करता आलं. विशेषत: राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला अभिनेता उपेंद्र लिमये जो एक कलाकार म्हणून श्रेष्ठ आहेच, मात्र माणूस म्हणूनही संवेदनशील आहे. नकुशी या मालिकेत काम करण्याचा अनुभव मला समृद्ध करणारा आहे,’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं.