‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत प्रभावी कीर्तन
ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे आता टीव्ही मालिकेत दिसणार आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’ या मालिकेत निवेदकाची भूमिका ते साकारत असून, या निमित्तानं कीर्तनासारखा लोककला प्रकार टीव्ही मालिकेत प्रथमच वापरला जाणार आहे.
नकुशी या सामाजिक प्रथेवर आधारित ‘नकुशी… तरीही हवीहवीशी’ ही मालिका स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. सामाजिक प्रथेवर आधारित मालिका आणि कीर्तनासारखा संगीतप्रधान कला प्रकार यांचा मिलाफ टीव्ही मालिकेत यापूर्वी झालेला नाही. आपल्या घराण्यात असलेला कीर्तनाचा वारसा चारुदत्त आफळे पुढे नेत आहेत. कीर्तनकार म्हणून आफळे यांची जगभर ख्याती आहे. तसंच संगीत रंगभूमीवर गायक अभिनेता म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख आहे. देशाविदेशात त्यांची कीर्तने होत असतात. आफळे बुवा आपल्या कीर्तनातून सामाजिक प्रबोधन, अनिष्ट प्रथांविरोधात जागृतीही करतात. स्लाईड शोसारख्या नव्या माध्यमांचा वापर करूनही ते कीर्तने करतात. आता प्रथमच ते टीव्ही मालिकेत निवेदक म्हणून काम करणार आहेत.
मालिकेत कीर्तनाचा निवेदनासाठी वापर करण्याविषयी दिग्दर्शक वैभव चिंचाळकरनं माहिती दिली. ‘नकुशी ही भीषण प्रथा आहे. मात्र, ती नावापुरती मर्यादित असल्यानं समाजात त्याची दाहकता पोहोचलेली नाही. आपल्याकडे कीर्तन, भारूड अशा लोककलांतून प्रबोधन करण्याची परंपरा आहे. या लोककलांतून समाजात सकारात्मक विचार पोहोचवला जातो. नकुशी हा नकारात्मक विचार दूर करण्यासाठी कीर्तन हे माध्यम उपयुक्त ठरू शकते अशी कल्पना सुचली. त्याशिवाय मालिकेत काहीतरी वेगळेपण आणण्याच्या दृष्टीनं कीर्तनाच्या पद्धतीनं निवेदन करणं हा प्रयोग करावासा वाटला. आतापर्यंत टीव्ही मालिकांत लोककलेचा प्रभावी पद्धतीनं वापर करून घेण्यात आलेला नाही. ज्येष्ठ कीर्तनकार आणि अभिनेता चारुदत्त आफळे ही निवेदकाची भूमिका साकारणार आहेत. कीर्तनाच्या पारंपरिक भाषेसह आताच्या समकालीन भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हे कीर्तन आपलंसं वाटेल,’ असं वैभवनं सांगितलं.