सोशल मीडियात मालिकेविषयी उत्सुकता
‘स्टार प्रवाह’वर १० ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या ‘नकुशी’ या मालिकेचं टायटल साँग महेश काळे यांनी संगीतबद्ध केलं आहे. या मालिकेद्वारे महेशचा संगीतकार म्हणून ‘स्टार प्रवाह’बरोबर नवा प्रवास सुरू होत असून, या मालिकेच्या टायटल साँग सहित टीजरला सोशल मीडियात भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
आजपर्यंत टीव्ही मालिकांतून गावगाड्याचं चित्रण झालेलं नाही. ती उणीव ‘नकुशी’ या मालिकेतून भरून निघणार आहे. ही अतिशय वेगळ्या विषयावरची मालिका असून ती नक्कीच लक्ष वेधून घेणार आहे. वाहिनीनं प्रदर्शित केलेल्या छोट्या टीजरमधूनच मालिकेचं वेगळेपण जाणवत आहे. हा टीजर पाहून मालिका सामाजिक पार्श्वभूमीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या लक्षवेधी टीजरमुळे मालिकेची कथा, कलाकार या विषयीची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली आहे.

महेश काळे यांनी या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच संगीत दिग्दर्शन केलं आहे. एक वेगळा प्रयोग करत असल्याचं महेश यांनी सोशल मीडियात जाहीर केलं होतं. त्यामुळे महेशच्या चाहत्यांमध्ये या गाण्याविषयी मोठी उत्सुकता होती. मालिकेच्या टायटल साँगचा टीजर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आल्यावर महेशच्या या नव्या प्रयत्नाचं सोशल मीडियातून भरभरून स्वागत झालं आहे.
समीर सामंतनं नकुशीचं टायटल साँग लिहिलं आहे. तर, बेला शेंडेनं गाणं गायलं आहे. महेश यांनी संगीतबद्ध केलेलं टायटल साँग ‘नकुशी’चं वैशिष्ट्य ठरणार आहे. वास्तवाचं नेमकं चित्रण हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. आता त्या पुढे एक पाऊल टाकत टीव्ही मालिकांची शहरी वातावरणाची चौकट मोडून वेगळा प्रवाह प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळेच या टीजरला सोशल मीडियातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.