सुचवलेल्या विषयांवर लिहायची संहिता
महाड येथील अभिषेक थिएटर्स या संस्थेच्या वतीने, मराठी नाटक ग्रुपच्या सहयोगाने नाट्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत हे नाट्यलेखन करायचे असून, स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरू असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आशीर्वाद मराठे यांनी दिली.
महाराष्ट्राला संपन्न अशी मराठी नाट्य परंपरा लाभली आहे. मात्र अलिकडे दर्जेदार संहिता मिळत नाहीत अशी खंत नाट्यनिर्माते, स्पर्धक संस्था आणि प्रेक्षकही व्यक्त करताना दिसतात. चांगले कलावंत असूनही चांगले स्क्रिप्ट मिळत नाही, अशी खंत दिग्दर्शक व्यक्त करीत असतात. लेखकांच्या बाजूने मराठीमध्ये चांगल्या संहिता चांगले विषय उपलब्ध व्हावेत आणि रंगकर्मींना ते सादर करता यावेत या उद्देशाने या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मराठे यांनी सांगितले.
या नाट्यस्पर्धेसाठी मराठी नाट्य, चित्रपट क्षेत्रातील पंधरा मान्यवरांनी विषय दिले आहेत. सुप्रसिद्ध नाट्य-चित्रपट अभिनेते प्रशांत दामले, निर्माता-दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे, दिग्दर्शक कुमार सोहोनी, लेखक- दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर, अभिनेते सुनील बर्वे, प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे, लेखक राजीव जोशी, नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी आणि चंद्र्कांत लोकरे, अभिनेते विजय कदम, जयवंत वाडकर, मानसी मराठे, मिलिंद अधिकारी, सौरभ पारखे, हेमंत भालेकर यांनी हे विषय सुचविले आहेत. त्या विषयांना अनुसरून दोन अंकी नाटकाचे लेखन करायचे आहे.
स्पर्धेचे प्रवेशमुल्य पाचशे रुपये असून ते अभिषेक कलामंच दि अण्णासाहेब सांवत को- ऑप अर्बन बँक महाड या बँकेत ००११००१०००१९११३ या खात्यात एनईएफटीने जमा करावयाचे आहेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकास कितीही संहिता पाठविता येतील. मात्र प्रत्येक संहितेसाठी वेगळी प्रवेश फी भरावी लागेल. संहितेमध्ये आक्षेपार्ह, जातीवाचक प्रक्षोभक लिखाण नसावे, अशा संहितांचा विचार केला जाणार नाही. नाट्यसंहितांचे परीक्षण करण्यासाठी लेखक, निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि सामान्य प्रेक्षकांचे एक पॅनल तयार करण्यात येणार आहे. ३१ मेपर्यंत सादर होणाऱ्या संहितांचाच स्पर्धेसाठी विचार करण्यात येणार असून संहितांच्या प्राथमिक आणि अंतिम परीक्षणानंतर निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे मराठे यांनी सांगितले.
स्पर्धेतील संहिताची आणि लेखकांचा डेटाबेस तयार करून लेखक आणि सादरकर्ते/ निर्माते/ दिग्दर्शक यांच्यात एक दुवा निर्माण करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये आणि अन्य वैशिष्ठ्यपूर्ण लिखाणासाठीदेखील रोख पुरस्कार दिले जातील.
स्पर्धकांनी आपली संहिता पीडीएफ फॉरमेटमध्ये lekhanspardha@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायचे आहे. अधिक माहितीसाठी आशीर्वाद मराठे यांच्याशी ९८२२५९५९७३ या क्रमांकावर संपर्क साधावा.