एक धम्माल हास्यबंबाळ नाटक
लग्नसंस्थेवर विश्वास नसलेल्या आजच्या तरुणाईंवर आधारीत “नवरी छळे नवर्याला” हे धम्माल विनोदी नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे.

प्रेम, लग्न आणि नंतर संसार हया गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. संसार हा सुखाचा असं आपण वरवर म्हणत असलो तरी तो टिकवण्यासाठी नवरा व बायको आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. मात्र आजची तरुण पिढी हया सगळ्यांकडे वेगळ्या अनुषंगाने पाहत असते. आजची तरुणाई झपाट्याने तंत्र आणि पाश्चात्य संस्कृतीच्या जाळ्यात अडकली असून लग्न संस्थेवर त्यांचा विश्वास उडाला आहे.
“नवरी छळे नवर्याला” हया नाटकाची कथा आहे एका विवाहित दांपत्याची. मनात नसताना आई – वडिलांच्या इच्छेखातर दोघे लग्न करतात. खरं तर या दोघांचा लग्नसंस्थेवर विश्वास नाही. आश्चर्य म्हणजे ज्या दिवशी लग्न होते त्याच दिवशी ते घटस्फोटासाठी घ्यायचं ठरवतात. पण घटस्फोट घ्यायचा कोणी ? यावर त्यांचा वाद सुरू होतो. पुढे काय होतं ? त्यांचा घटस्फोट होतो का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्षात नाटकात पाहायला मिळतील. अभिनेता सुचित जाधव हया नाटकाची निर्मिती करत असून हया नाटकात ते प्रमुख भूमिकेत आहेत. याआधी त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकातून तसेच अनेक मालिका व चित्रपटातून आपली छाप पाडली आहे. पुण्यात आपल्या अभिनयाने सर्वांना परिचित असलेली अभिनेत्री सोनाली गायकवाड हया नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर काम करीत आहे. हया नाटकाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता दिगंबर नाईक यांनी यात वैविध्यपूर्ण अशा दहा भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ह्यातील विविध भूमिका साकारताना त्या त्या भूमिकेच्या मागणीनुसार आपली देहबोली आणि संवादाचा लहेजा यामध्ये अफलातून बदल केले आहेत. प्रेक्षकांना आपलंस वाटणारं हे नाटक राकेश नामदेव शिर्के यांनी लिहिले आहे. बर्याच कालावधीनंतर ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचं संगीत या नाटकाला लाभलं असून यातील शिर्षक गीत प्रसिध्द गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी गायिले आहे. प्रकाश योजना राजन ताम्हाणे यांची असून नेपथ्य प्रकाश मयेकर, वेशभूषा पौर्णिमा ओक तर सुत्रधार गोट्या सावंत हे आहेत. आजच्या तरुणाईच्या एकूणच मानसिकतेवर प्रकाश टाकून दांपत्यामधील कडू गोड संघर्ष आणि खटके यांचं रंजक दर्शन घडवणारं हे नाटक निश्चितपणे प्रेक्षकांना एक वेगळा आनंद आणि विरंगुळा देईल असा निर्माते – दिग्दर्शकांना यांना विश्वास आहे.