रसिकांनी अनुभवली कलाविष्कारांची त्रिवेणी
प्रसाद फणसे आणि नवरस आर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘त्रिवेणी’ या कार्यक्रमात रसिकांनी नाट्यसंगीत, लावणी, अभंगांचा अनोखा त्रिवेणी संगम अनुभवला. हा कलाविष्कार नुकताच रविंद्र नाट्यमंदिर येथील मिनी थिएटरमध्ये संपन्न झाला.
कोजागिरी पौर्णिमेचा योग साधून सादर झालेल्या या सांगीतिक कार्यक्रमाचे संयोजक होते प्रसाद फणसे. मूळ रचना ऐकवत त्या अनुषंगाने धनश्री लेले यांनी प्रत्येक संगीतप्रकाराचे अभ्यासपूर्ण व रसाळ विवेचन केले. राधिका फणसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या तिन्ही प्रकारच्या गीतांवर बहारदार नृत्ये सादर केली. या सर्व कलाविष्कारांनी सर्वच रसिकांची मने जिंकली. एक चांगला सांगीतिक व चांगली संकल्पना असलेला कार्यक्रम रसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरला.