स्टार प्रवाहच्या ‘गोठ’ मालिकेत करारी व्यक्तिरेखा
सिने-नाट्य क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. टीव्ही मालिकांचा प्रवाह बदलण्याच्या दृष्टीने ‘स्टार प्रवाह’ नव्या मालिका सादर करते आहे. त्यापैकी ‘गोठ’ या नव्या मालिकेत नीलकांती पाटेकर ‘बयो आजी’ ही करारी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

नीलकांती पाटेकर यांनी पूर्वी दोन टीव्ही मालिकांची निर्मिती केली. चित्रपट, रंगभूमीवर काम केलं. मात्र ‘गोठ’ ही त्यांची अभिनेत्री म्हणून पहिलीच मालिका आहे.


‘या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहेत. मालिकेतली प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळ्या पद्धतीनं लिहिली आहे. सिनेमॅटिक पद्धतीनं मालिका होणं हे खूप वेगळं आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमला नेमकं काय करायचं हे माहीत आहे. त्यामुळे कथानक खूप वेगळ्या पद्धतीनं समोर येणार आहे. या मालिकेत काम करताना मला वेगळे काम केल्याचे समाधान मिळते आहे. अशी वेगळ्या पद्धतीची मालिका केल्याबद्दल स्टार प्रवाहचं कौतुक करावंसं वाटतं. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्की आवडेल,’ असंही नीलकांती पाटेकर यांनी आवर्जून सांगितलं.