वर्ल्ड ऑफ म्युझिकला रसिकांची भरभरून दाद
सत्तर वादकांनी भारलेला रंगमंच… नवनव्या संगीत रचना… दिग्गज वादकांचं थक्क करणारं वादन… रोमांचित संगीतप्रेमींकडून मिळालेली वन्स मोअरची दाद… निमित्त होतं नेहा चांदेकर यांच्या स्कॅन एंटरटेनतर्फे आयोजित ‘वर्ल्ड ऑफ म्युझिक’ या म्युझिकल कॉन्सर्टचं.
ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या या भव्यदिव्य कॉन्सर्टला संगीतप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिली. तालवाद्यवादक निलेश परब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्य या वाद्य संगीताच्या या अनोख्या कॉन्सर्टनं संगीतरसिकांना तालसंगीताच्या विश्वाची सफर घडवली. व्हायोलिन, पियानो, तबला, ढोलकी, बासरी, ड्रम्स, ढोलताशा, चेलो, जेंबेसारखी अशा देशी-विदेशी वाद्यांचा अनोखा मिलाफ रसिकांना या कॉन्सर्टमध्ये अनुभवायला मिळाला.
या कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले होते तर बासरीवादक वरद कठापुरकर, ढोलकीवादक कृष्णा घोटकर, व्हायोलिन वादक सुरेश लालवाणी, व्हायोलिनवादक श्रुती भावे, मृदंगमवादक श्रीधर पार्थसारथी, ड्रम्सवादक दत्ता तावडे, तबलावादक मंदार गोगटे आणि आर्चिस लेले यांनी आपल्या प्रयोगशील बहारदार सादरीकरणाने हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेला.
डोंबिवलीतील तरूण ढोलवादकांचं पथक आणि व्हायोलिन, व्हिओला आणि चेलो वादकांच्या अठराजणांच्या चमूनं या कॉन्सर्टमध्ये अप्रतिम वादन केलं. किरवाणी-मधुवंती असे राग, तालवाद्यांची रंगलेली जुगलबंदी यातून रसिकांना तालासुराचा आनंद अनुभवायला मिळाला. भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीताच्या मिलाफातून निर्माण झालेली स्वतंत्र भाषा रसिकांनीही दाद देत आत्मसात केली.
निलेश परब आणि कमलेश भडकमकर यांच्या नवनिर्मित रचनांनी नव्या संगीताचा आनंद दिला. तसंच सुरेश ललवाणी यांनी छेडलेल्या व्हायोलिनच्या आर्त स्वरांनी रसिकांचे डोळे पाणावले. तर, श्रीधर पार्थसारथी यांचे मृदंगम् आणि युवा पथकाच्या ढोलताशा वादनानं रसिकांना ताल धरायला लावला. शीतल तळपदे यांच्या उत्तम प्रकाशयोजनेने ही कॉन्सर्ट नेत्रदीपक ठरली.
सूत्रसंचालक पुष्कर श्रोत्रीनं नेहमीच्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करून कार्यक्रम खुलवला. तसंच उत्तमोत्तम रचनांचं मर्म सांगत रसिकांना मार्गदर्शनही केलं. तर, वादकांच्या दमदार सादरीकरणानंतर न राहावून स्वत:ही वाद्य हाती घेऊन ताल धरला. नेहमीच्या कॉन्सर्टच्या पलिकडे जाऊन नवनिर्मितीचा आणि संगीताचा अद्भूत अनुभव या कॉन्सर्टनं रसिकांना दिला. दीर्घकाळ स्मरणात राहणारा हा संगीतानुभव असल्याची भावना रसिकांनी व्यक्त केली.