रवी जाधव दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट
गेल्या काही महिन्यांपासून न्यूड(चित्रा)’ची बरीच चर्चा झाली होती. चित्रपटाच्या नावावरूनही अनेकांच्या मनात कुतूहलाची भावना जागी झाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असून, येत्या २७ एप्रिलला तो महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांतील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, चित्रपटात मुलाच्या शिक्षणसाठी धडपड करताना एका कला महाविद्यालयात ‘न्यूड मॉडेल’ म्हणून काम करणाऱ्या यमुनेनी (कल्याणी मूळेंनी), खऱ्याआयुष्यात सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् महाविद्यालयात गेली ३० वर्ष ज्ञानदानाचे हेच काम करणाऱ्या लक्ष्मी यांना बोलते केले. लक्ष्मी यांनी त्यांना या प्रवासात आलेले अनुभव कथन केले. त्या म्हणाल्या, मला माझ्या कामाचा सार्थ अभिमान आहे. मला विद्यार्थ्यांनी इथे देवाचा दर्जा दिला आणि आता या विषयावर सिनेमा येऊ घातलाय. प्रेक्षकांसमोर आमची कथा मांडली जाणार आहे यासारखा दुसरा आनंद नाही.

मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मी निर्माण करीत असलेल्या कलाकृतींमध्ये अश्लीलता नाही, तर कलात्मकताच असेल, याची खात्री बाळगावी, असेही रवी यांनी सांगितले.
या चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून, पटकथा आणि संवाद सचिन कुंडलकर यांनी लिहिले आहेत. रवी जाधव दिग्दर्शित या सिनेमाचे अप्रतिम छायाचित्रण केले आहे अमलेंदू चौधरी यांनी तर संकलन केले आहे अभिजीत देशपांडे यांनी. कथेला अनुसरुन कला दिग्दर्शन करण्याची जबाबदारी संतोष फुटाणे आणि महेश साळगावकर यांनी पेलली आहे आणि वेशभूषा साकारली आहे मेघना जाधव यांनी.
सौरभ भालेराव यांचं पार्श्वसंगीत चित्रपटात असून सायली खरे आणि विद्या राव यांनी वैयक्तिकरित्या या चित्रपटात दोन गाणी लिहिली आहेत आणि स्वरबद्धही केलेली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ‘न्यूड’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणखी एक चौकटीबाहेरील कथानक मोठ्या पडद्यावर पाहाता येणार आहे.