पु. ल. देशपांडे कला अकादमीत रंगणार मैफल
दिवसाच्या ठराविक प्रहराला ठराविक राग आळवण्याची भारतीय शास्त्रीय संगिताची परंपरा आहे. असे असले तरीही, नियोजित वेळेला नियोजित राग गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मैफली आपल्या शहरात फारच क्वचित अनुभवायला मिळतात. प्रातःस्वर या सकाळच्या रागमालिकेच्या कार्यक्रमाच्या ८८ व्या सत्रात प्रसिद्ध गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांची मैफल रंगणार आहे. विश्वनाथ शिरोडकर हे त्यांना तबल्यावर साथ देणार असून सीमा शिरोडकर यांच्या संवादिनीची साथ मिळणार आहे. २८ मे २०१७ रोजी सकाळी ६.३० वाजता मुंबईतील प्रभादेवी येथे रविंद्र नाट्य मंदिरातील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कला प्रांगणात ही मैफल रंगणार असून यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क आकारले जाणार नाही. या कार्यक्रमाला टाटा कॅपीटलचे सहकार्य लाभले आहे.
ऑक्टोबर ते मे या कालावधीतील प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी ´प्रातःस्वर´ हा पहाटेच्या म्हणजे प्रातःप्रहराच्या रागांवर आधारित कार्यक्रम आयोजित केला जात असून यात ज्येष्ठ व तरुण नवोदित कलाकारांच्या कलांचे सादरीकरण केले जाते. ही मैफल साधारणतः दोन तासांसाठी रंगते.
आजपर्यंत झालेल्या ८६ मैफलींमध्ये एकदाही ´प्रातःस्वर´मध्ये आपली कला सादर करणाऱ्या कलाकारमंडळींमध्ये तोचतोचपणा आलेला नाही. दरवेळी नवीन कलाकारांना संधी दिली जाते. सम्राट पंडीत, सहाना बॅनर्जी, रमाकांत गायकवाड या नवोदित तरुण कलाकारांपासून हरिप्रसाद चौरसिया, उल्हास कशाळकर आणि एन. राजम यांसारख्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत मोठ्या संख्येने प्रातःस्वरमध्ये कलाकार सहभागी होतात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगिताच्या जगतात पहाटेच्या मंगलसमयी जवळजवळ ७०० हून अधिक श्रोत्यांना बांधून ठेवणारी प्रातःस्वर ही मैफल म्हणजे ´ब्रॅण्ड इव्हेंट´ बनली आहे.
कलाकाराविषयी थोडेसे : ग्वाल्हेर व किराणा घराण्याचे पुणेस्थित प्रसिद्ध गायक गंगाधर पिंपळखरे यांच्याकडे वयाच्या दहाव्या वर्षी पद्माताईंनी संगिताचे धडे घेण्यास सुरूवात केली. मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडूनही त्यांनी जयपूर घराण्याचे वैविध्य आत्मसात केले असून, किशोरीताई आमोणकर यांच्यासह काम करून त्यांनी मैफली रंगवण्याची कलाही आत्मसात करून घेतली. एक उत्कृष्ट कलाकार म्हणून मंच रंगवताना त्यांच्या व्यक्तीगत स्पर्शाने प्रत्येक रागदारीमध्ये एक वेगळेपण भरले जाते. त्यांनी नंतरच्या काळात जयपूर, ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याचे नामवंत गायक पंडीत गजाननराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचे सांगीतिक ज्ञान अधिक प्रखर बनवले.