मकरसंक्रातीचे औचित्य साधून घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट, ठाणे येथील हरमीस मैदानावर शुभकुंदा प्रतिष्ठान व घोडबंदर टाइम्सतर्फे पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या पतंग महोत्सवाला सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा हिरानंदानी रहिवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
घोडबंदर टाइम्सचे संपादक प्रवीण नागरे यांनी या उत्सवासाठी पतंग व दोऱ्याचे मोफत आयोजन केले होते. नवीन पिढीमध्ये भारतीय संस्कृती रुजविण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता. या प्रसंगी आयोजकांनी ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ असा संवाद करत आयोजक प्रवीण नागरे यानी तिळगुळ उपस्थितांना वाटला.
या पतंग महोत्सवाला ५०० हून अधिक पालकांनी त्यांच्या पाल्यांसह येऊन पतंग घेऊन विविध आकार व प्रकाराचे रंगीबेरंगी पतंग उडवून पतंगबाजीचा आनंद लुटला. कुटुंबासमवेत उत्स्फूर्तपणे मुले, पालक व वृद्ध मंडळींनी या उत्सवाचा मनसोक्तआनंद घेतला.
दुपारी महोत्सवाला सुरुवात झाली. वारा आणि गर्दीचा अंदाज घेत पतंगपटूंकडून ‘एक से बढकर एक’ पतंग आकाशात उडवण्यास सुरुवात केली. या निमित्ताने ठाणेकरांना पतंगबाजीची प्रात्यक्षिके पाहायला मिळाली. महोत्सवाची रंगत वाढावी यासाठी गाण्यांच्या तालावर पतंगी आकाशात सोडल्या जात होत्या. सर्वात मोठा पतंग व सर्वात लहान पतंग या महोत्सवाचे वेगळेपण ठरले. वेगवेगळ्या आकारातील रंगीत मोठ्या पतंगांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. पतंग महोत्सव पाहण्यासाठी बालगोपाळांसह अनेक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भव्य आकारातील पतंग आकाशात विहरत असताना अनेकांनी मोबाईलमध्ये ते क्षण टिपले. स्थानिक शिवसेना नगरसेवक नरेश मणेरा, विभागप्रमुख मुकेश ठोंबरे आदीनी पतंग महोत्सवाला भेट दिली.