उत्कंठा वाढवणारी प्रेमकहाणी
रेहा फिल्म प्रोडक्शनच्या निर्मात्या दीक्षा युवराज सुरवाडे यांनी पाच नवोदित कलाकारांना प्राधान्य देऊन मराठी चित्रपट तयार केला असून, त्या चित्रपटाचे नाव आहे ‘प्रेमसंकट’.

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलंय दत्ता मिरकुटे यांनी. त्यांनीच अरुण कुलकर्णीसोबत संवादही लिहिलेत. ‘प्रेमसंकट’मधील पाचही गाणी, जी भरपूर लोकप्रियता मिळवताहेत, संगीतबद्ध केली आहेत संगीतकार विशाल वानखेडे यांनी व स्वरसाज चढवलाय साधना सरगम, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, अमीर शेख, निशा भगत, प्रतिभा बागेल यांनी.
‘प्रेमसंकट’ची कथा फिरते दोन मुले आणि तीन मुलींभोवती, ज्यात प्रेम, दोस्ती, अपहरण, सूड, स्मृतीभंश, वगैरे गोष्टींमुळे प्रत्येक प्रसंगानंतर उत्कंठा वाढत जाते. ज्यामुळे प्रेक्षक खुर्चीला खिळून बसतील. राज आणि त्याचे मित्र यांनी पूजाला एका कुप्रसिद्ध गुंड, मनडोलापासून वाचवलेले असूनही शेवटी ती राजला ओळखायला नकार देते. खरतर राज पोलिसांची मदत घेऊन पूजाला संरक्षण देतो. पण एकदा तिच्यासाठी जेवण घेऊन जात असताना मनडोला त्याला पकडतो व बेदम मारहाण करतो व त्याचा आई-वडिलांना धमकी देतो. परंतु राज कोणालाही न जुमानता पूजाला एका फार्म हाऊसमध्ये लपवून ठेवतो. त्याच काळात त्यांचे एकमेकांवर प्रेम जडते. त्यांच्या प्रेमाची अखेर काय होते? पूजा राजला ओळखायला का नकार देते? मनडोला राज-पूजाला शोधून काढतो का? इत्यादी गुंतागुंतीची उकल ‘प्रेमसंकट’ चित्रात पाहायला मिळणार आहे.
दिग्दर्शकाने अधे-मधे विनोदाची पेरणी करत प्रसंग खुसखुशीत होतील याची काळजी घेतली आहे. या चित्रपटात, राज सुरवाडे, मोनालिसा बागल, राहुल भिसे, अंकिता परमार, दामिनी डोळस या नवीन कलाकारांसोबत मातब्बर कलाकारांचा फौलफाटादेखील आहे, उदा. निशिगंधा वाड, सतीश पुळेकर, लतिका गोरे, यतीन कार्येकर, राजेंद्र शिसातकर. या चित्रपटाचे मनोहारी चित्रीकरण केलंय रवी भट यांनी व सहाय्यक दिग्दर्शक आहेत मोहम्मद शेख आणि नम्रता शाह.