भिवा पुणेकर आणि पानेरी पुणेकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन
प्रसिद्ध चित्रकार भिवा पुणेकर आणि पानेरी भिवा पुणेकर या बापलेकीचे चित्राविष्कार मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत कलाप्रेमींना खुणावत आहेत. हे प्रदर्शन १२ सप्टेंबरपासून सुरू झाले असून ते १८ सप्टेंबर २०२३ सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बघता येतील.
ट्रान्सनडेंटल पर्सेपशन

भिवा पुणेकर हे गेली अनेक वर्षे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवतात. त्यांची अनेक एकल व समूह प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. एक्रीलिक रंग, मिक्स्ड मिडिया अशा विविध माध्यमांत भिवा पुणेकर काम करतात. त्यांच्या प्रस्तुत ट्रान्सडेंटल परसेप्शन या चित्र प्रदर्शनात चिरस्थायी दैवी अनुभवाला पेपर व कॅनव्हासवर मांडण्याचा प्रयत्न पुणेकर यांनी केला आहे.

हे जग पंचमहाभूतांनी तयार झाले आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि अंतराळ हे ते पाच घटक आहेत. आपल्या डोळ्यांना ज्या स्वरूपात ते दिसतात त्यापेक्षा त्यांचे अस्तित्व हे सर्वव्यापी आहे. या अस्तित्वाला अमूर्त शैलीत यांनी चित्रित केले आहे. पुणेकरांच्या कॅनव्हासवरील मुक्त केवलाकार हे या पंचमहाभूतांना सकारात्मक आणि उत्साही स्वरूपात चित्रित करतात. काळा, लाल, पिवळा अशा गूढ आणि गंभीर रंगांचा कालाकृतीमधील वापर या चित्रांना अध्यात्मिक परिमाण देतो.
ट्रान्सनडन्स ऑफ बनारस

युवा चित्रकार पानेरी पुणेकर या भिवा पुणेकर यांच्या कन्या आहेत. प्रसिद्ध अशा सर जे जे इंस्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट इथून त्यांनी आपले कलेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी अनेक समूह चित्र प्रदर्शनामध्ये यशस्वी सहभाग नोंदवला आहे. वडीलांप्रमाणेच त्यांचे चित्र विषय अध्यात्मिक असले तरी त्यांच्या चित्रांची भाषा ही वेगळी आहे. वास्तववादी चित्रांतून त्यांनी बनारसच्या अध्यात्मिक वातावरणाला चित्र रुपात मांडले आहे. तेजस्वी आणि प्रसन्न रंगांचा वापर या चित्रांना मोहकतेचे परिणाम मिळवून देतो. पानेरी या बहुतांशी एकरंगी माध्यमात काम करतात. पण बनारसाच्या आध्यत्मिक आणि सात्विक वातावरणाने त्यांना अनेक तेजस्वी रंगांचा वापर आपल्या चित्रांमध्ये करण्याची प्रेरणा दिली. बनारस हे अध्यात्म आणि सकारात्मकता यांचे प्रतीक आहे. संध्या समयी बनारस येथील घाट हे अदभुत रंगांची उधळण करतात. हे घाट आणि इथली सकारात्मक अनुभूती पेपरवर, मिक्स मिडिया मधून पानेरी यांनी चित्रित केली आहे.

आध्यत्मिक आणि सकारात्मक अनुभव देणारे हे बापलेकीच्या कलाकृती रसिकांना एक सुंदर अनुभव देणारे आहे. त्यामुळे कला रसिकांनी हे प्रदर्शन आवर्जून बघण्यासारखे आहे. हे प्रदर्शन कला रसिकांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहील.
