नोटा रद्द झाल्या म्हणजे नेमकं काय झालं, नोटा बदलायच्या म्हणजे काय करायचं इथपासून ते बदल्यात किती रक्कम मिळणार याची अनेकांना माहिती नाही. हे लक्षात घेऊन ‘स्टार प्रवाह’च्या नकुशी मालिकेतील नकुशी कारणारी प्रसिद्धी आयलवार आणि ‘गोठ’ या मालिकेतील राधा साकारणारी रुपल नंद यांनी मुंबईतील काही भाजी विक्रेत्यांना मार्गदर्शन केलं.
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याची घोषणा करण्यात आली. १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान नोटा बँकांतून बदलून घेण्यासाठी मुदत देण्यात आली. मात्र, बाजारपेठेत विचित्र परिस्थिती आहे.
प्रसिद्धी आणि रुपल यांनी झालेल्या बदलाची माहिती भाजी विक्रेत्यांना दिली. नोटा बदलण्यासाठी कोणाच्याही प्रलोभनांना फसू नका, बँकेत किंवा पोस्टात जाऊनच नोटा बदलून घ्या, तुम्ही दिलेल्या रकमेएवढीच रक्कम मिळणार आहे, यात कोणतीही योजना नाही अशी माहिती देण्यात आली.
भाजी विक्रेत्यांनीही या दोघींचं म्हणणं नीट समजून घेतलं आणि त्यांनी पुढाकार घेऊन माहिती दिल्याबद्दल आभार मानले. राधा आणि नकुशीच्या यांच्या या कृतीतून त्यांचं सामाजिक भान दिसून आलं.