राहुल फुलकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुरु
प्रसिद्ध चित्रकार राहुल फुलकर यांच्या ‘मोहनम’ या शीर्षकांतर्गत नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन, वरळी, मुंबई येथे सुरु आहे. ४ सप्टेंबर पर्यंत हे प्रदर्शन रसिकांना सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बघता येईल.
मिनिएचर पेंण्टिंग्ज, गडद रंगसंगती, मुघल काळाची आठवण करून देतील अशी चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. मानवी आकृत्या आपल्या स्वतःच्या कल्पनेने रंगवून सौंदर्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न चित्रकाराने या प्रदर्शनाद्वारे केला आहे. तसेच त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व कलात्मक शैलीतून प्रणयीजनांचे भावविश्व व त्या भावनांची उत्कटता, दैवी प्रेमाचा साक्षात्कार, नादमयता, राधा कृष्ण ह्यांच्या वैश्विक व दैवी प्रेमाचा आविष्कार आणि विविध वाद्ये वाजवून आपल्या कलेचे सादरीकरण करताना कलाकाराने साधलेली एकतानता व समरसता ह्यांचे नितांतसुंदर दर्शन आपल्या तंत्रशुद्ध व मनोरम शैलीतून रसिकांपुढे सादर केले आहे. तसेच गाय, शेळी व इतर पाळीव प्राण्यांबद्दल मानवी मनात असणारी ममतेची व आपलेपणाची भावना वगैरेचे फार प्रभावी पण रमणीय दर्शन त्याने आपल्या चित्रांमधून रसिकांना दिले आहे.
विविध प्रणयीजनांची मानसिकता व भावनोत्कटता, दैवी प्रेमाचे विशुद्ध रूप व तो भाव, आपली कला उत्तम तऱ्हेने सादर करताना रसिकांशी कलाकाराने साधलेला संवाद व त्याची नादमयता तसेच अर्थपूर्ण रसविभोर अशी अनुभूती वगैरेमुळे त्याचे प्रत्येक चित्र अतिशय बोलके, स्पष्ट व लालित्यपूर्ण झाले आहे.